Guhagar : क्रीडांगण अबाधित राखून ‘ब्ल्यू फ्लॅग’ची अंमलबजावणी करण्याची मागणी

गुहागर : गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील नियोजित ब्ल्यू फ्लॅग मानांकनातून शहराचा विकास होत असेल तर क्रीडांगण अबाधित राखून ब्ल्यू फ्लॅगची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शुक्रवारी भंडारी भवन येथे आयोजित बैठकीत शहरवासियांनी केली. ब्ल्यू फ्लॅग मानांकनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आयोजित केलेल्या बैठकीला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण उपस्थित होते.
या बैठकीत शहरासाठी एकमेव क्रीडांगण असून ते अबाधित राखून सदर मानांकनाचे काम सुरू रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी नगरपंचायत डीपीमधील आरक्षण, रस्ता रुंदीकरण यावरही चर्चा झाली; मात्र याबाबत कोणाचा आक्षेप असल्यास डीपीच्या अंतिम मंजुरीकरिता आपणाकडून हरकतींसठी मुदत दिली जाईल. त्यावेळी शहरवासियांनी आपल्या समस्या व हरकती लेखी स्वरुपात मांडाव्यात, असे मुख्याधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ब्ल्यू फ्लॅगमध्ये कोणाची खासगी जागा जात नाही. आपले क्रीडांगणाबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे; मात्र पर्यटकांसाठी समुद्रकिनारी शौचालय, छोट्या-मोठ्या एटीएम, व्यवसायिकांसाठी व्यवस्था, शुद्ध पाणी, सुरक्षारक्षक अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयातून आदेश आल्यानंतर आपण काम सुरू ठेवले आहे. यामुळे गुहागरला एक चालून आलेली संधी असल्याचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी अॅड. संकेत साळवी यांनी ब्ल्यू फ्लॅगबाबतची प्रशासनाची भूमिका आणि शहरवासियांनी आपली स्थानिक संस्कृती अवाधित राखून कशा सुविधा निर्माण करून घेता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आवश्यक सूचना नगरपंचायतीकडे सादर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 04/Nov/2025