Dapoli : दापोली पोस्टगल्ली परिसरात तरुणाकडून वाहनांची तोडफोड

दापोली : दापोली शहरातील पोस्टगल्ली परिसरात रविवारी (२ नोव्हेंबर) मध्यरात्री नशेत एका तरुणाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली व दुचाकी आडव्या पाहून नुकसान केले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी विलोका व्ही. सुमी (वय २० वर्षे, रा. पोस्टाची गल्ली, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी, मूळ रा. इगोटो, ता. सिटीमेड डाउन, जि. किफिरे, राज्य नागालँड) या तरुणास ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवर मोठे दगड आणि चिरा मारून तोडफोड केली. त्याने योगेश दत्तात्रय वैद्य (वय ५३, व्यवसाय ज्वेलर्स, रा. पोस्टाची गल्ली, दापोली) यांच्या मालकीच्या मोटारीच्या काचा फोडल्या. तसेच सुशील शशिकुमार मिसाळ यांच्या मालकीच्या मोटारीचे नुकसान केले. या तोडफोडीमुळे
सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तसेच येथे उभ्या असलेल्या ४ दुचाकी आडव्याच पडल्या.

घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून संबंधित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने हे कृत्य नेमके का केले, याचा तपास सुरू आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विक्रम बुरोंडकर करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 04/Nov/2025