Sangmeshwar: संगमेश्वरमधील ८० टक्के महिलांचे हिमोग्लोबीन कमी

संगमेश्वर : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीसोबतच बदलत चाललेली आहारपद्धती, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि व्यायामाचा अभाव यामुळे विविध आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.

याचाच प्रत्यय संगमेश्वर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या हिमोग्लोबिन तपासणी मोहिमेतून आला आहे. या मोहिमेत तालुक्यातील तब्बल ५० हजार विद्यार्थी आणि ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यातून ७० टक्के पुरुष आणि तब्बल ८० टक्के महिलांचे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या प्रोजेक्ट ऑफिसर दीपिका रांबाडे यांनी दिली.

गुजरात येथील श्रीमद् रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि स्वयंपूर्तता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही अॅनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी मोहीम राबवण्यात आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेनुसार, भारतात ७० टक्के जनता अॅनिमियाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन श्रीमद् रामचंद्र हॉस्पिटलने देशातील विविध जिल्ह्यांमध्ये हिमोग्लोबिन तपासणी व उपचारमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक संस्थांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील जबाबदारी स्वयंपूर्तता फाउंडेशनकडे सोपवण्यात आली असून, या फाउंडेशनने पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्याची तपासणी पूर्ण केली आहे.

विद्यार्थ्यांमध्येही चिंताजनक स्थिती
या तपासणीमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही हीमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे. अनेक शाळांमध्ये प्रार्थनेदरम्यान किंवा खेळताना विद्यार्थी अचानक चक्कर येऊन पडतात. हे प्रकार केवळ हिमोग्लोबिन कमतरतेमुळे घडत असल्याचे फाउंडेशनच्या अहवालात नमूद आहे म्हणूनच फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या तपासणीला विशेष प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यालये, यात्रा, सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ही तपासणी मोहीम राबवली आहे.

Rotary School

तपासणीतील आकडेवारी
एकूण तपासणी: ५० हजार नागरिक
१७ हजार ३१४ (७०%) पुरुषांमध्ये कमतरता
२० हजार १३२ (८०%) महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 04-11-2025