चिपळूण : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपरिषदेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मतदार याद्यांवरच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून शहरातील तब्बल १,३०१ मतदारांची नावे पुन्हा मूळ प्रभागात समाविष्ट केली आहेत.
शहरात एकूण १४ प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली असून, प्रत्येकीसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ४२,८५१ मतदारांची नोंद करण्यात आली होती. मात्र, या याद्यांवर हरकती व सूचनांसाठी दिलेल्या मुदतीत १५१ नागरिकांनी आपली नावे चुकीच्या प्रभागात गेल्याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. या हरकतींची प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी प्रांत कार्यालयात सुनावणी घेतली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर १,४२९ नावांपैकी १,३०१ नावे मतदारांच्या मागणीनुसार त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करण्याचा निर्णय देण्यात आला. तर उर्वरित १२८ नावे अमान्य करण्यात आली.
मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे व प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक रोहित खाडे व निवडणूक विभागप्रमुख सागर शेडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करून अंतिम यादी तयार केली आहे. ही यादी नोटीस बोर्ड, संकेतस्थळ व कार्यालयात उपलब्ध झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 04/Nov/2025














