वाईनला दारूच्या यादीतून वगळा; माधव महाजन यांची खा. नारायण राणे यांच्याकडे मागणी

चिपळूण : दापोली तालुक्यातील कोळथरे गावचे प्रगतशील शेतकरी माधव महाजन यांनी काजू बोंडापासून वाईन निर्मितीचा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. मात्र वाईनला दारूच्या श्रेणीत समाविष्ट केल्याने या उपक्रमास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाईनला दारूच्या यादीतून वगळा, अशी मागणी महाजन यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे.

रत्नागिरीत खा. नारायण राणे यांच्या जनतर दरबारात महाजन यांनी वाईन ही दारू नाही, असा ठाम मुद्दा मांडत निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी खा. राणे यांची स्वतंत्रपणे भेटही घेतली. या भेटीत महाजन यांनी स्वतःच्या प्रयोगाविषयी माहिती दिली. तसेच कोकणातील फळ उद्योगासाठी यामध्ये किती मोठी क्रांती दडलेली आहे, हे पटवून दिले. काजू बोंड, फणस, आंबा आणि जांभूळ यासारख्या फळांपासून तयार होणाऱ्या वाईनला सरकारी मान्यता मिळाल्यास कोकणातील शेतकऱ्यांना नवे आर्थिक दार उघडेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

कोकणातील वाया जाणारे फळ म्हणजे सुवर्णसंधी आहे; त्यातून शेतकऱ्यांचे भविष्य घडू शकते, असे महाजन यांनी सांगितले. यावर खा. राणे यांनी महाजन यांचा प्रयोग ऐकून उत्सुकता दर्शवली असून मी स्वतः तुमची वायनरी पाहायला येईन, असे आश्वासन दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 06/Nov/2025