रत्नागिरी : भारत सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव वर्ष उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. याअनुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातही जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत जनजातीय गौरव वर्ष पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
हा उत्सव सामाजिक-आर्थिक विकास आणि जागरुकता, शिक्षण, कौशल्य विकास, उपजीविका, उद्योजकता, आरोग्य, कल्याण, कायदा, संस्कृती, वारसा आणि पायाभूत सुविधांचा विकास तसेच, शासन व संस्थात्मक बळकटीकरण यासारख्या विविध उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
या पंधरवड्यामध्ये योजनेच्या संकल्पाबाबत माहिती देणे, फिल्ड टेस्ट किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणे, पाणी गुणवत्तेबद्दल जागरूकता निर्माण करणे, पाणीपट्टी वसुली आणि देखभाल दुरुस्ती संदर्भात माहिती देणे, गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरी काढणे, पाणी वापर आणि पाणी व्यवस्थापन योजनेच्या शाश्वततेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वैदेही रानडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या जनजातीय गौरव पंधरवड्यात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:11 PM 07/Nov/2025












