नागपूर मडगाव प्रतीक्षा एक्स्प्रेसला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या प्रतीक्षा द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीला येत्या २९ डिसेंबर २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे व प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती. त्यानुसार ही द्विसाप्ताहिक गाडी चालू झाली आहे. गाडीला येत्या २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली होती. मात्र दिवाळी आणि नाताळच्या गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या गाडीला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सुटून गुरुवार आणि रविवारी मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर गुरुवार आणि रविवारी मडगावहून सायंकाळी ७ वाजून १ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री पावणेदहा नागपूरला पोहोचेल. या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५२ फेऱ्या होणार आहेत.

या द्विसाप्ताहिक गाडीचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेगावच्या राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले यांच्यासह विविध प्रवासी संघटनांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 23-09-2024