राजापूर : राजापुर तालुक्यात अवकाळी झालेल्या पावसात २०३ हेक्टरवरील एक हजार १९२ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले असून तालुका कृषी विभागाकडून याचे पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तशी माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी पत्रकारांना दिली आहे.
ऑक्टोबर मध्ये तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला आहे. याता भात पिकाबरोबरच गवताचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे। भविष्यात वैरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
राजापूर तालुक्यात या अवकाळी पावसात २०३ हेक्टरवरील एक हजार १९२ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. याचे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आजपर्यंत कृषी विभागाने १०३४ शेतकऱ्यांचे पंचनामे पुर्ण केले आहेत. उर्वरित पंचनामेही पुर्ण केले जाणार आहेत. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असून अनुदान येताच नुकसानीचे वाटप केले जाणार असल्याचे गंबरे यांनी सांगितले.
यापुर्वी जून ते सप्टेंबर या काळातही मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसाचा व पुराचा फटका काही शेतकऱ्यांना बसला होता. त्याचेही पंचनामे करून अहवाल शासनाकडे देण्यात आला आहे. यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 08/Nov/2025












