चिपळूण : अनुकूल वातावरणामुळे तालुक्यातील भातशेती यंदा चांगलीच बहरली असताना परतीच्या पावसामुळे बहरलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील १६८ गावामध्ये आतापर्यंत ४९५.६५ हेक्टरवर शेतीचे पंचमाने करण्यात आले असून यामध्ये २२७७ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात नुकसानीचे पंचमाने पूर्ण होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
कोकणात भातशेती हे प्रमुख पिकापैकी एक असून तालुक्यातील बहुतांशी शेतकरी याच लागवडीला प्राधान्य देत आले आहेत. भौगोलिकदृष्ट्या तालुका विस्तारित असून त्यामध्ये ७ हजार हेक्टर भातशेतीचे क्षेत्र आहे. यंदा मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे पेरणी कामाचा खोळंबा झाला होता. शिवाय चिखमय शेतीत पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न भेडसावू लागला होता. असे असताना पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कशीबशी पेरणी कामे पूर्णत्वास गेली होती. जून, जुलै महिन्यात भातलावणी दरम्यान मुबलक पाऊस व त्यानंतर शेतीस मिळालेले पोषक वातावरण यामुळे यंदा तालुक्यात भातशेती चांगलीच बहरली होती. ऑक्टोबर महिन्यात हळवे भात पीक कापणीस तयार झाले असताना काहीठिकाणी पावसाचा अंदाज घेत शेतकरीवर्गाने कापणी देखील सुरू केली आहे. असे असताना परतीच्या पावसाने मात्र चांगलाच घोळ घातला. तालुक्यात बहरलेली भातशेती आडवी झाली. शिवाय चिखलमय व साचलेल्या पाण्यावर भातशेती तरंगू लागली आहे. बहरलेल्या भातशेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत सापडला. याबरोबरच हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. या नुकसान झालेल्या भातशेतीचा आमदार शेखर निकम यांनीही आढावा घेतला आहे.
तालुक्यातील १८६ गावांमध्ये कृषी, महसूल व ग्रामसेवक यांचे संयुक्त पंचमाने सुरू करण्यात आले असून ते अद्याप सुरुच आहेत. त्यानुसार ७ हजार हेक्टरपैकी ४९५.६५ हेक्टरवर जवळपास २२७७ इतक्या बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात हे पंचमाने कामे पूर्णत्वास जाणार आहेत. या नुकसानीमध्ये भात शेतीबरोबरच नाचणी पिकांचा देखील समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 08/Nov/2025














