“नगरसेवक लादणार नाही, पण… एका वर्षात काम दाखवा, नाहीतर राजीनामा द्या!” – उदय सामंतांचा सज्जड दम

रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज प्रभाग क्रमांक ५ मधून फोडण्यात आला. या पहिल्याच प्रचार सभेला संबोधित करताना राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी पक्षातील इच्छुक उमेदवारांना आणि भावी नगरसेवकांना ‘परफॉर्मन्स’वरून सज्जड दम भरला आहे. “उमेदवार लादणार नाही, पण निवडून आल्यावर एका वर्षात काम दाखवा, नाहीतर राजीनामा द्या,” अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रचार सभेला महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

“माझ्या डाव्या-उजव्या बसणारे उमेदवार नसतील”

उमेदवारीवरून पक्षात आणि महायुतीत सुरू असलेल्या चर्चेवर मंत्री उदय सामंत यांनी थेट भाष्य केले. ते म्हणाले, “अनेकांच्या मनात शंका आहे की, पालकमंत्री उदय सामंत आहे, त्यामुळे माझ्या डाव्या-उजव्या बसणाऱ्या किंवा माझ्या गाडीत फिरणाऱ्या लोकांना तिकीट मिळेल. पण मी आज स्पष्ट सांगतो, आमच्या डोक्यात असलेले नव्हे, तर तुमच्या मनात असलेले, तुमच्या सुखदुःखात उभे राहणारे उमेदवारच दिले जातील. कोणताही उमेदवार तुमच्यावर लादला जाणार नाही.”

‘स्मार्ट सिटी’साठी एका वर्षाची ‘डेडलाईन’

उमेदवार निवडीसोबतच त्यांनी निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या कामाचा हिशोबही ठरवून दिला. भावी नगरसेवकांसाठी त्यांनी थेट एका वर्षाची ‘डेडलाईन’च जाहीर केली.

मंत्री सामंत म्हणाले, “पुढच्या ३६५ दिवसांत आपल्याला रत्नागिरी ‘स्मार्ट सिटी’ करून दाखवायची आहे. मी तुम्हाला शब्द देतो, जे नगरसेवक निवडून आल्यानंतर एक वर्षात ‘परफॉर्मन्स’ दाखवणार नाहीत, जे अपेक्षित काम करणार नाहीत, त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. अशा अकार्यक्षम नगरसेवकांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.” पालकमंत्र्यांनी भर सभेत इच्छुकांना दिलेल्या या थेट इशाऱ्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.