“राजेश सावंतांच्या कन्येवर एकही वाईट शब्द नको”; उदय सामंतांचा ‘संस्कारी’ बाणा, महायुतीला सक्त निर्देश

रत्नागिरी: आगामी रत्नागिरी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला. प्रभाग ५ मधून प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ६ मध्ये देखील प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘संस्कारी’ राजकारणाच्या विचारांचे दर्शन घडवत, महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला.

राजकारणात वैयक्तिक टीका-टिप्पणीला स्थान न देण्याच्या आपल्या तत्त्वाचा पुनरुच्चार करत ना. सामंत यांनी विरोधकांवर, विशेषतः संभाव्य महिला उमेदवारावर, कोणताही वाईट शब्द न वापरण्याचे सक्त निर्देश दिले.

“विकासाने मने जिंका, बदनामीने नको”

आपल्या भाषणाची सुरुवात करताना उदय सामंत यांनी महायुतीची प्रचाराची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, “आपल्याला विकासाने लोकांची मनं जिंकायची आहेत. कुठेही टीका-टिप्पणी करून, बदनामी करून किंवा वैयक्तिक हल्ले करून मते मिळवायची, असा विचार आम्ही केलेला नाही.”

संभाव्य महिला उमेदवाराबाबत सक्त सूचना

यावेळी ना. सामंत यांनी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारीवर भाष्य करताना कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना केली. ते म्हणाले, “मला अद्याप माहीत नाही की महाविकास आघाडीचे तिकीट कोणाला जाहीर झाले. पण कदाचित, आपले मित्र आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (ज्यांनी राजीनामा दिला) राजेश सावंत यांच्या कन्येला ते तिकीट जाहीर झाले, तर आपल्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या माध्यमातून एकही वाईट शब्द तिच्या विरोधात जाता कामा नये.”

“हि विनंती नाही, पालकमंत्री म्हणून निर्देश आहे”

आपली भूमिका अधिक स्पष्ट करत ना. सामंत म्हणाले, “ही माझी तुम्हाला विनंती नाही, तर पालकमंत्री म्हणून दिलेला निर्देश समजावा. जो कोणी उमेदवार असे करेल, त्याचा प्रचार मी थांबवणार. कारण कोणतरी गाय मारत आहे, म्हणून आपण वासरू मारण्याची गरज नाही. ते माझ्यावर टीका करतात, म्हणून त्यांच्यावर टीका केली पाहिजे, असे बंधन आपल्यावर नाही. शेवटी ती देखील एक मुलगी आहे, याचे भान आपण सगळ्यांनी ठेवले पाहिजे.”

“तोंडाला कुलूप लावून विकास सांगा”

राजेश सावंत यांच्या भूतकाळातील संबंधांची आठवण करून देत ते म्हणाले, “राजकारण करत असताना समोरच्यावर घाणेरडी टीका केली पाहिजे, असे बंधन आपल्या नेत्यांनी घातलेले नाही. आपण संस्कारित आहोत. काही काळापूर्वी राजेश सावंत आपल्यासोबत काम करत होते, ते कॉलेजमध्येही सोबत होते. त्यांच्या घरातली मुलगी म्हणजे आपल्या घरातली मुलगी आहे, असे समजून प्रत्येकाने पुढील २० दिवस स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून आपण केलेला विकास फक्त लोकांपर्यंत पोहोचवा.”

सभेला जमलेल्या गर्दीचा उल्लेख करत ते म्हणाले, “ही गर्दी उगाच नाही. दोन-दोन तास लोक थांबतात, हे त्यांचे आपल्यावरील प्रेम आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका-टिप्पणी करणे, खालच्या दर्जाला जाऊन बोलणे, हे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चालणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.