रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या नगर परिषद आणि गुहागर, लांजा, देवरुख नगरपंचायतच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (दि. १० नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील सर्वच नगरांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, संभाव्य उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून येत आहे. अर्ज सादरीकरणासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
१० ते १४ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतील. १५ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी, तर १८ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवार यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रात कार्यकर्ते आपल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाले असून, प्रचारयंत्रणा कार्यरत झाली आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहिता आणि ध्वनीप्रदूषणासंबंधी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रचारासाठी ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य ठरणार आहे. रत्नागिरी व चिपळूणमध्ये महत्त्वाच्या पक्ष नेत्यांची गर्दी वाढू लागली असून, अनेक ठिकाणी उमेदवार निश्चितीसाठी पक्षांतर्गत बैठकाही सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातसुद्धा निवडणुकीची चुणूक जाणवू लागली असून, मतदारांमध्ये चर्चेचे वारे सुरू झाले आहेत. प्रचारयंत्रणा, जनसंपर्क मोहिमा आणि सोशल मीडियावरची चढाओढ या सगळ्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 10/Nov/2025












