दापोली : दापोलीतील सकाळ आता आगळं सौंदर्य लेवून उगवते. पहाटे गावांवर धुक्याची रुपेरी चादर पसरते, हवेतल्या गार झुळुकीने अंगावर शहारा येतो. थंडी सायंकाळनंतर हळूहळू गडद होत जाते. रात्रीचा पारा घसरत ८ नोव्हेंबरला किमान तापमान १७.५, तर रविवारी पारा १४.० अं.से. इतका खाली उत्तरल्याने हुडहुडी भरण्यास सुरूवात झाली.
दिवसभर ऊबदार उन्हाची साथ असली तरी सूर्य मावळताच वातावरणात थंडगार शांतता उतरते. थंडीबरोबरच वर्षातील सर्वात मोहक दृश्य अनुभव देणारे पांढऱ्या पंखांचे सीगल दापोलीत दाखल झाले आहेत.
हर्णे बंदर, कर्दे, केळशी, मुरुड, आडे-पाडले, तसेच रत्नागिरीमधील गणपतीपुळे व आरे-वारे किनाऱ्यांवर सीगल्सची चैतन्यमय हालचाल सुरू झाली आहे. सायबेरिया, रशिया आणि उत्तर युरोपातील बर्फाळ प्रदेशांत तापमान शून्याखाली घसरू लागले की अन्नटंचाई निर्माण होते. त्या वेळी हे पक्षी ५ ते ६ हजार किलोमीटरचा थकवणारा प्रवास करून थेट कोकण किनाऱ्यावर येतात. समुद्राचे निळे पाणी, ऊबदार वातावरण आणि मुबलक सागरी खाद्य यामुळे कोकण त्यांचे हिवाळ्यातील निसर्ग-घर बनते. पहाटेच्या धुक्यात लाटांवर तरंगत उडणारे, थवे करून आकाशात झेपावणारे आणि अचानक पाण्यात कोसळून मासे टिपणारे हे पक्षी पर्यटकांसाठी जणू जिवंत निसर्गचित्रच बनतात. हर्णे बंदरातून निघणाऱ्या बोटींच्या आजूबाजूला हे सीगल्स गर्दी करताना दिसतात.
दापोलीबरोबरच संगमेश्वर, चिपळूण, लांजासह अन्य तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या सकाळच्या सत्रात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. सध्या निवळी घाटात धुक्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे. निवळी, वांद्री कोळंबे या पट्ट्यात दाट धुक्यामध्ये गावे हरवलेली दिसत आहेत. थंडी सुरू झाल्याने आंबा बागायतदारांना हायसं वाटलंय. लांबलेल्या पावसामुळे हंगामाला किती विलंब होणार याकडे सर्वच आंबा बागायतदारांचे लक्ष लागलेले आहे. थंडीची चाहूल लागल्यामुळे बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पर्यटकांची गजबज वाढणार
समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या सीगलचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांचीही पावले वळू लागलेली आहेत. पर्यटकांचे कॅमेऱ्यांसह थवे आणि पंखांची शुभ्र लयबद्ध हालचाली करणारे सीगल असे चित्र हर्णे, कर्दे, भाट्ये किनारी तुरळक दिसू लागले आहे. थंडी वाढत असल्यामुळे दापोलीत पर्यटकांची गजबज वाढू लागली आहे.
हवामानात बऱ्यापैकी बदल दिसून येत आहे. आजचा पारा देखील उतरला आहे. सीगल दिसू लागले म्हणजे थंडी नीट स्थिरावतेय, समुद्रही शांत होऊ लागला आहे. ही दरवर्षीची खूण आहे. परिसरातील समुद्री जैवसाखळी आरोग्यवान असल्याचे संकेत त्यांची उपस्थिती देतेय- तुषार महाडिक, सचिव, वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 10/Nov/2025












