रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा-खडप मोहल्ला येथे तीन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणातून कामगारा आरीने (धारदार शस्त्र) वार करुन खून करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
निरज तेजप्रताप निषाद (वय ४०, मुळ रा. जि. गोरखपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात सुहेब हिदायत वस्ता (रा. झाडगाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. २ ऑगस्ट २०२५ मयत प्रिन्स मंगरु निषाद (१८, शांतिनगर नाचणे, रत्नागिरी) आणि संशयित निरज निषाद हे दोघेही फिर्यादीच्या मिरकरवाडा येथील नवीन मोबाईल शॉपीचे फर्निचरचे काम करत होते. त्यावेळी प्रिन्स हा कामाच्या वेळी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या कारणातून निरजचे त्याच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात निरजने बाजूची आरी प्रिन्सच्या छातीत मारुन त्याचा खून केला. त्यानंतर निरज निषाद आणि त्याच कामावरील अन्य एक सहकारी अनूज चौरसिया याच्यासोबत त्याने तेथून पळ काढला. शहर पोलिसांना खुनाची माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल लोकेशद्वारे ते रेल्वेस्टेशनला असल्याचा माहिती मिळाली. पोलिसांनी रेल्वे स्टेशन येथून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य संशयित निरज निषाद हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शुक्रवारी (ता. ७) दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ यांनी निरजला सशर्त जामिन मंजूर केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 10/Nov/2025













