केशवसुत स्मारक जागतिक दर्जाचे बनविण्याचे प्रयत्न करू : आमदार संजय केळकर

रत्नागिरी : कवी केशवसुत स्मारक अत्याधुनिक स्वरूपामध्ये व्हावे यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव शासनदरबारी सादर करावा. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून कवी केशवसुतांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त आमदार संजय केळकर यांनी केले.

कोमसापच्या कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कोकणात साहित्यिक चळवळ दृढ होण्यामागे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची मोलाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले, या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित गद्य, वैचारिक, संकीर्ण, आत्मचरित्र, चरित्र या विभागासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकाची पुरस्कार कोकणातील विविध साहित्यिकांना प्रदान करण्यात आहे. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषद अंतर्गत कविता राजधानी पुरस्कार, कोकण साहित्य भूषण, श्री. बा. कारखानीस पुरस्कार, के. भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार यासह विविध साहित्येतर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय अध्यक्षा नमिता कोर यांनीसुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा पुरस्कार साहित्यकृतीला वा आपल्या कार्याला जाहीर होणे, हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठा सुवर्णक्षण असून, तो क्षण आज या निमित्ताने अनेक पुरस्कारार्थी साहित्यिकांचा पूर्ण होत असल्याची माहिती दिली. केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांनी साहित्यिक म्हणून मराठी भाषेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलन मॉरिशसमध्ये झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

या वेळी श्रीकांत रानबरे यांच्या नारायण प्रभा, कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख अरुण तुकाराम मोर्ये यांच्या अस्वस्थ मनाच्या कविता या कवितासंग्रहाचे आणि पालघर शाखेचे सभासद रमेश पाटील यांच्या ‘तोडू अंधाराचे जाळे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 10/Nov/2025

Gim trainer