Mandangad : आंबेत पुलाजवळ वाळूसाठ्याला तीव्र विरोध

मंडणगड : जिल्ह्यातील सावित्री खाडीतील उमरोली गटातून वाळूउपसा करण्यास शासनाने परवानगी दिली आहे; मात्र उपसण्यात येणारी वाळू म्हाप्रळ येथील आंबेतपूलनजीक साठवण्याचा प्रयत्न असून, याला राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष व माजी सभापती भाई पोस्टुरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पोस्टुरे यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. शासन नियम आणि पर्यावरणीय परिणामांचा सविस्तर उल्लेख करत या साठाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

आंबेतपूल हा नुकताच शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून दुरुस्त करण्यात आला असला, तरी तो अजून पूर्णक्षमतेने सक्षम नाही. अशा परिस्थितीत पुलाजवळ वाळूसाठा केल्यास पुलाला गंभीर धोका निर्माण होईल. आंबेतपूल परिसर हा इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असल्याने येथे कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक साठवणीला परवानगी देता येत नाही. उमरोली गटातील वाळू बार्जमार्गे वाहून आणल्यास खाडीतील वळणदार प्रवाहामुळे आंबेतपुलाच्या पिलर्सना धडकण्याची शक्यता आहे.

वाळूउपसा आणि साठवणीमुळे नदीतील नैसर्गिक प्रवाह आणि जैवविविधतेवर परिणाम होऊन मच्छीमारांची उपजीविका धोक्यात येईल. जर या ठिकाणी वाळूसाठवणीस परवानगी दिली गेली, तर हा निर्णय स्थानिकांच्या हितावर घाला घालणारा ठरेल.

आंबेतपुलाचा हा परिसर पर्यावरणीय क्षेत्रात येत असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून परवानगी नाकारावी अन्यथा या निर्णयाविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनानंतर स्थानिक पातळीवर वाळू साठवणीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली असून, नागरिकांनीदेखील पुलाच्या सुरक्षिततेचा आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे आणला आहे. आता तहसील प्रशासन या बाबतीत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 11/Nov/2025