रत्नागिरी : २ महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे ‘कोकण विजय’ सागरी नौकाभ्रमण मोहिमेचे उद्घाटन एनसीसी कोल्हापूरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी सोमवारी भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी अल्ट्राटेक जेटी येथे केले.
‘स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोकण’ या संकल्पनेवर आधारित या मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, एनसीसी डायरेक्टरेटचे संचालक कॅप्टन जितेन जैन, सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप कृष्ण, २ महा. एनसीसी नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर रामांजुल दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. पुढील १० दिवसांमध्ये ६० नेव्हल कॅडेट्स निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरून १२७ नॉटिकल मैल सागरातून नौकाविहार करणार आहेत. यामध्ये रनपार, आंबोळगड, पूर्णगड, आणि विजयदुर्ग या महत्त्वाच्या किनारी ठिकाणांवर मुक्कामाचा समावेश आहे. या प्रवासाद्वारे कॅडेट्सना प्रत्यक्ष दिशादर्शन, किनारी भूगोल व समुद्री कार्यपद्धतींचा अनुभव मिळणार आहे.
या मोहिमेस वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई तसेच भारतीय तटरक्षक दल यांचे तांत्रिक, कार्यकारी आणि सुरक्षा साहाय्य मिळणार आहे. कमांडिंग ऑफिसर कमांडर रामांजुल दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेत अधिकारी २ नेव्हल अधिकारी, २ ए. एनओएनसीसी अधिकारी, १० नेव्हल स्टाफ, २ शैक्षणिक स्टाफ, २ मेडिकल स्टाफ, २ सिव्हिल स्टाफ आणि ८ राज्य शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत.
स्वच्छ, सुंदर कोकणचा संदेश
‘कोकण विजय’ ही मोहीम कॅडेट्समध्ये समुद्री कौशल्य, संघभावना, शिस्त, साहसी वृत्ती आणि किनारी पर्यावरण-जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली आहे तसेच स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध कोकण या संदेशाला बळकटी देत कोकणच्या सागरी वारशाकडेही लक्ष वेधण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 11-11-2025













