“ही निवडणूक नेत्यांच्या बदनामीचा बदला घेण्यासाठी”; रत्नागिरीत महायुतीचा ‘संकल्प’, पालकमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या (Ratnagiri Municipal Election) पार्श्वभूमीवर, महायुतीमधील एकीची वज्रमूठ दाखवण्यासाठी आज रत्नागिरीतील स्वयंवर कार्यालयात ‘महायुतीचा संकल्प आणि समन्वय मेळावा’ पार पडला. या मेळाव्याला महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी अत्यंत आक्रमक आणि भावनिक आवाहन करत आगामी निवडणूक का महत्त्वाची आहे, याचा ठाम पुनरुच्चार केला.

“ही निवडणूक साधीसुधी नसून, गेल्या काही महिन्यांत महाविकास आघाडीकडून आपल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना (देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार) वैयक्तिक पातळीवर टार्गेट करून नामोहरम करण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा बदला घेण्यासाठी आहे,” असे सडेतोड प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.

युतीचा पाया महाराष्ट्रात रत्नागिरीतूनच

पालकमंत्र्यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीच्या जडणघडणीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मी सर्वप्रथम भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना धन्यवाद देतो, कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत महायुती व्हावी, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच, खासदार नारायण राणे साहेबांनीही महायुतीनेच लढले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली आणि अजित दादांनीही रत्नागिरीत महायुतीला संमती दिली. त्यामुळेच आज आपण एकत्र कामाला लागलो आहोत.”

‘संकल्प मेळावा, उमेदवार वाटपाचा नाही’

मेळाव्यात इच्छुकांची मोठी गर्दी पाहून पालकमंत्र्यांनी तिकीट वाटपाबाबतची भूमिका स्पष्ट केली. “हा संकल्प मेळावा आहे, उमेदवार देण्याचा मेळावा नाही. भाजपाच्या उमेदवारांचा निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिवसेनेच्या उमेदवारांचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा निर्णय अजित दादा घेतील. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हा विषय नंतरचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “३ तारखेला जे फटाके वाजतील ते महायुतीचेच वाजतील. ही निवडणूक उदय सामंत मोठा की राजन साळवी मोठे, हे ठरवणारी नसून, अजित दादा, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब मोठे आहेत, हे ठरवणारी आहे.”

“सर्वेप्रमाणे आपण जिंकलोय, पण गाफील राहू नका”

पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना अतिआत्मविश्वासाचा धोकाही सांगितला. “आज सगळे सर्वे माझ्याकडे आहेत. त्याप्रमाणे या जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका महायुतीने ‘ऑलरेडी’ जिंकलेल्या आहेत. पण आपण जिंकलेलो आहोत म्हणून गाफील राहण्यात अर्थ नाही. २३२ आमदार असताना आपण हजार-दोन हजार मतांनी जिंकलो तर ते योग्य नाही. समोरच्याचे डिपॉझिट जप्त करून आपण जिंकले पाहिजे, एवढी ताकद आपण निर्माण करणे गरजेचे आहे,” असा कानमंत्रही त्यांनी दिला.

जिल्हा परिषद, पंचायत समितीलाही युती होणार

या मेळाव्यात पालकमंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. “मी सहा महिन्यांपूर्वीपासून सांगत होतो की रत्नागिरी जिल्ह्यात १००% युती होणार आहे. आज ते खरे ठरले. आता पुढचे सांगतो, जिल्हा परिषदेला देखील युती होणार आहे आणि पंचायत समितीला देखील दोन्ही जिल्ह्यांमध्ये (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) युती होणार आहे,” असे त्यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यामागील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “आमच्या (आमदारांच्या) निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला निवडून दिले. आज तुमच्या निवडणुका आहेत. मग तुम्हाला सभागृहात पाठवताना आम्ही स्वार्थासाठी तुम्हाला वेगळे लढवून राजकारण करायचे, हे उदय सामंतच्या राजकारणात बसत नाही.”

‘कुटुंब’ म्हणून काम करा, बंडखोरी टाळा

तिकीट वाटपातील अडचण मान्य करत ते म्हणाले, “आपल्याकडे जत्रा असल्यासारखे उमेदवारी अर्ज आलेले आहेत. पण तिकीट एकालाच मिळणार. त्यामुळे आपण ‘पक्ष’ म्हणून नाही, तर ‘महायुती कुटुंब’ म्हणून काम केले पाहिजे. तिकीट कोणालाही मिळो, तो आपल्या कुटुंबातला आहे, असे समजून काम केल्यास पराभवाला सामोरे जावे लागणार नाही.”

यावेळी त्यांनी काल रात्री उशिरा बैठक ठरल्यानंतरही राजन पटवर्धन आणि इतरांनी ज्या वेगाने मेसेज पाठवून कार्यकर्त्यांना एकत्र केले, याबद्दल त्यांचे कौतुक करत आपले सर्वांवर बारीक लक्ष असल्याचेही नमूद केले.

महिलांचा सन्मान आणि नेत्यांवरील टीकेला उत्तर

“समोरचे काही आपले पारंपरिक वैरी नाहीत,” असे सांगत त्यांनी निवडणुकीत महिला भगिनींचा अपमान होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. “आमच्यावर टीका झाली तरी चालेल, पण ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब किंवा आमच्या तिन्ही मुख्य नेत्यांवर फालतू टीका होईल, त्यावेळी आपण रस्त्यावर उतरले पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.

लांजा आणि राजापूरबाबत बोलताना त्यांनी, “तेथील निर्णय स्थानिक नेत्यांवर (राजन साळवी, अमित केतकर इ.) सोपवण्यात आला असून, लांजापासून खेडपर्यंत सर्व नगरपालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार,” असा विश्वास व्यक्त केला.