Breaking : कुवारबाव येथे ९० कोटींचा उड्डाणपूल मंजूर; नितीन गडकरींकडून हिरवा कंदील, उदय सामंतांचे प्रयत्न यशस्वी

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गासंदर्भात (Mirya-Nagpur Highway) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट मिळत आहे. रत्नागिरी शहरातून हातखंबा येथे जाताना वाहतूक कोंडीचा मुख्य पॉईंट ठरलेल्या कुवारबाव (Kuwarbav) येथे तब्बल ९० कोटी रुपयांच्या भव्य उड्डाणपुलाला (Flyover) मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या माध्यमातून हा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न यशस्वी

रत्नागिरी शहरातून हातखंबा येथे जाताना कुवारबाव जंक्शनवर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे महामार्गाच्या कामात या ठिकाणी फक्त रस्ता रुंदीकरण होणार की वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उड्डाणपूल होणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागले होते.

अखेर, या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत (Uday Samant) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ९० कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी दिली आहे.

फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरुवात

प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी पुलाच्या कामाची निविदा (Tender) प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबई-गोवा महामार्गासाठीही ठरणार महत्त्वाचा

सध्या सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरणाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी वाहतुकीवर ताण येत आहे. अशा परिस्थितीत कुवारबाव येथील हा नवीन उड्डाणपूल भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या पुलामुळे कुवारबाव परिसरातील वाहतूक जलद, सुरळीत आणि सिग्नलमुक्त होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.