Rajapur : जवाहर चौकातून बाजारपेठेतील वाहतूक बंद; व्यापारी, रहिवाशांमधून तीव्र नाराजी

राजापूर : नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन दाखल करणे आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्याचा कालावधी सुरू झालेला असताना या आठ दिवसांच्या कालावधीसाठी सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत प्रशासनाने जवाहर चौकातून बाजारपेठेतील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यापारी व रहिवाशांनी असंतोष व्यक्त करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्यवसाय ठप्प होणार असल्याने काही व्यावसायिकांनी तर आपल्याच घरात जाण्यासाठी बंदी करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना सलग आठ दिवस आपल्या साहित्याच्या वाहतुकीसाठी वाहने घेऊन बाजारपेठेत जाताच येणार नसेल तर याचा मोठा फटका बाजारपेठेला बसणार आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यापारी रहिवासी यांचीही मोठीही गैरसोय होणार आहे.

यापूर्वीही राजापूर नगर परिषदेच्या असंख्य पंचवार्षिक निवडणुका झालेल्या आहेत मात्र कधीही उमेदवारी अर्ज सादर करणे अथवा माघारी घेणे या प्रक्रियेसाठी राजापूरच्या बाजारपेठेचे मुख्य प्रवेशद्वार व्यावसायिकांच्या दिवसभराच्या मुख्य कालावधीसाठी वाहतुकीकरिता बंद करण्याचा घाट घातलेला नव्हता. आचारसंहितेच्या प्रवळ अंमलबजावणींतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करताना काटेकोर नियम असल्याने बाजारपेठेतील प्रवेशद्वारावरच पोलीस यंत्रणा तपासणी करू शकते. मात्र दुचाकी, रिक्षा अशा कोणत्याही वाहनांना तब्बल आठ दिवस प्रतिबंध करून निवडणूक प्रशासन व्यावसायिकांच्या पोटावर पाय आणू शकत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिक बाजारपेठेतील रहिवाशांच्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 12/Nov/2025