रत्नागिरी : मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर बसलवलेल्या दुचाकींवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी सायंकाळी शहरातील तीन बुलेट गाड्यांवर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यामुळे कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या अनेक दुचाकीचालकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे छत्रपती संभाजीनगर येथे बुलेटला असलेल्या कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर असताना जशी कारवाई करायचे तशाचप्रकारचे आदेश रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्याकडून नुकतेच देण्यात आले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी अशा दुचाकींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नेहरू तारांगण परिसरात तीन दुचाकीस्वार अशाचप्रकारे कर्णकर्कश आवाजाच्या बुलेट फिरवताना पोलिसांचा पथकाला आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना उपप्रादेशिक परिवहनने वाहनाच्या नियमात असलेल्या गाडीत बदल करून गाडीला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावलेले असल्याचे निदर्शनास आले. या सायलेन्सरच्या आवाजामुळे जनसामान्य नागरिक, लहान मुले, वयस्कर व्यक्ती तसेच महाविद्यालये, रुग्णालये परिसरात याचा त्रास होत होता. त्यामुळे गेले काही दिवस शहर पोलिस अशा दुचाकी चालकांच्या शोधात होते.
अखेर शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ७ वा. सुमारास नेहरू तारांगण येथे अशा तीन दुचाकींवर काराई केली. ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक केदार वायचळ, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, पोलिस हवालदार पूनम ढवळ, पोलिस हवालदार अनुप पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले, यांच्या उपस्थितीत केली आहे.
शहर पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात जर असे कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले दुचाकीस्वार जर फिरत असतील तर त्यांचा फोटो मोबाईलद्वारे काढा आणि शहर पोलिसांना तो पाठवा, जेणेकरून पोलिस कारवाई करतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 12/Nov/2025













