रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या (Ratnagiri Municipal Election) पार्श्वभूमीवर एक सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला महायुतीच्या (Mahayuti) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ अखेर संपला आहे.
शिवसेनेकडून (Shiv Sena) श्रीमती शिल्पा सुर्वे (Shilpa Surve) यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या सूचनेनुसार, आज रात्री उशिरा ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (सोमवार, १७ नोव्हेंबर) हा शेवटचा दिवस असल्याने या घोषणेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
‘रत्नागिरी खबरदार’च्या सर्वेक्षणात होत्या अव्वल
विशेष म्हणजे, नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये ‘रत्नागिरी खबरदार’ (Ratnagiri Khabardar) या वृत्तवाहिनीने घेतलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात (Online Survey) शिल्पा सुर्वे यांनाच नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली होती.
या सर्वेक्षणात शिल्पा सुर्वे यांना सर्वाधिक २८.२ टक्के मते मिळाली होती. नागरिकांचा हा वाढता कौल आणि पक्षांतर्गत सर्वेक्षण या दोन्ही बाबी उमेदवारीसाठी निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे.
अखेर रात्री उशिरा शिक्कामोर्तब
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार, याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता ताणली गेली होती. शिवसेना पक्षाकडूनही अंतर्गत सर्वेक्षण घेण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज उमेदवारी निश्चित करण्याच्या अंतिम प्रक्रियेत, महायुतीतील नगरसेवकांचे आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत देखील जाणून घेण्यात आले. सर्वांच्या संमतीने आणि वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार, अखेर आज रात्री उशिरा शिल्पा सुर्वे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. या घोषणेमुळे आता रत्नागिरीतील नगराध्यक्ष पदाच्या थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.















