संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलाचे काम गेली अनेक वर्षे रखडले असून, ठेकेदार कंपनीने अलीकडेच फलक लावून, १३ नोव्हेंबरपासून वाहतूक त्यातच पुलाच्या गर्डर चेक कामासाठी बंद राहील, अशी माहिती दिली होती. या घोषणेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होणार असल्याच्या भीतीने प्रवासी, ग्राहक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात अद्याप काम सुरू न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पर्यायी मार्ग कोणता आणि कसा निवडावा याबाबत गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. तथापि, फलक लावूनही प्रत्यक्षात कोणतेही काम हातीच घेण्यात आलेले नाही. त्यामुळे संगमेश्वर-वाशी परिसरातील नागरिकांमध्ये आणखीनच गोंधळ निर्माण झाला आहे. ठेकेदार कंपनी तसेच पुलाच्या गर्डरचे काम करणाऱ्या एबीसी कंपनीकडून नागरिकांची दिशाभूल होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून, कामाबाबत योग्य आणि स्पष्ट माहिती न देण्याचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नावडी विभागप्रमुख वैभव मुरकर यांनी ठेकेदार कंपनीला इशारा दिला आहे. लोकांची दिशाभूल थांबवा. प्रवाशांची पिळवणूक ताबडतोब बंद करा. गर्डरच्या कामाबाबत संगमेश्वर-वाशी नागरिकांना योग्य माहिती द्या; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून ठेकेदार कंपनीला जाब विचारू. योग्य ती कारवाई करून दणका देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 18/Nov/2025














