उमेदवारी अर्ज छाननीत केतन शेट्ये यांना दिलासा! महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज कायम; विरोधकांचे आक्षेप फेटाळले

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल, मंगळवारी (दि. १८) उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत प्रभाग क्रमांक ४ ब मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केतन उमेश शेट्ये यांच्या उमेदवारी अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घेतलेले सर्व आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे केतन शेट्ये यांचा अर्ज निवडणुकीसाठी कायम राहिला आहे.

महायुतीच्या उमेदवाराचा आक्षेप, शेट्ये यांचा कागदपत्रांसह खुलासा
महायुतीचे (शिवसेना-शिंदे गट) प्रभाग ४ ब मधील उमेदवार इलियास खोपेकर यांनी केतन शेट्ये यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. केतन शेट्ये यांनी आवश्यक असणाऱ्या काही कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचा खोपेकर यांचा दावा होता.

मात्र, अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान केतन शेट्ये यांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सादर केली आणि कागदपत्रांची पूर्तता पूर्ण असल्याचे स्पष्ट केले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आक्षेप फेटाळले
केतन शेट्ये यांनी सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रे तपासल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. अखेर, अर्ज छाननीनंतर प्रभाग ४ ब मधून केतन उमेश शेट्ये यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी वैध ठरवून कायम करण्यात आला.

समर्थकांकडून तीव्र प्रतिक्रिया: ‘माजी नगराध्यक्षांच्या वारसाचा छळ!’
अर्ज कायम राहिल्यानंतर केतन शेट्ये यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, अर्ज छाननी दरम्यान घडलेल्या या सर्व घडामोडींवर त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केतन शेट्ये हे रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय उमेश शेट्ये यांचे पुत्र आहेत. ‘राजकीय दबावातून स्व. उमेश शेट्ये यांच्या वारसाला निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि हा एक प्रकारे छळ आहे,’ असा आरोप समर्थकांनी यावेळी केला आहे. या आरोपामुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या निर्णयामुळे आता प्रभाग ४ ब मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 19/Nov/2025