मुलींच्या पसंतीचा कल मुंबई, पुण्याकडे!

दापोली : लग्नसराईचा हंगाम रंगात आला असताना समाजात अलीकडच्या काळापासून एक वेगळीच हवा जाणवत आहे. मुलींच्या पसंतीचा कल हा स्पष्टपणे शहरांकडे झुकलेला आहे. आजही बहुसंख्य मुलींना मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरात राहणारा नवरा हवा. मुला-मुलींच्या पसंती आधीच ही अट पुढे येते. परिणामतः गावात स्थायिक असलेल्या मुलांचे टेन्शन यामुळे वाढले असून, जरी घरची परिस्थिती चांगली, शेतीभाती व्यवस्थित, नोकरी व्यवसाय समाधानकारक असला तरीही मुली नकार देताना दिसत आहेत.

मुलींना संसार शहरात करायचा आहे, ही भूमिका जवळपास ‘अट’ म्हणूनच पुढे येते. मुलींच्या पालकांच्याही अपेक्षांमध्ये हा बदल स्पष्ट त्यातून दिसून येतो. मुंबई किंवा पुण्यात स्वतःचे घर, खोली किंवा किमान राहण्याची सोय असावी, अशी मागणी जवळपास सर्व प्रस्तावांमध्ये जाणवते.

गावात स्थायिक असलेल्या मुलांना मात्र प्रत्येक प्रस्तावासोबत शहराचा प्रश्न अडसर ठरत आहे. “मुंबईत येणार का?”, “खोली आहे का?”, “नोकरी शहरात मिळेल का?” या प्रश्नांशिवाय भेट पूर्ण होतच नाही. गावातल्या मुलांकडे मोठी घरे, स्वच्छ हवा, आर्थिक स्थैर्य असलं तरीही या गोष्टींकडे फारसं लक्ष न जाता, शहरातल्या सोयी-सुविधांची चमकच डोळ्यांत भरते. काही पालक तर मुलगा उत्तम असला तरीही फक्त गावामुळे प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्टपणे अनेकदा समोर आले आहे.

शहरात राहणाऱ्या मुलांना दोन, तीन भेटीत जोडीदार मिळतो, तर गावातील मुलांना वीस, पंचवीस प्रस्तावांनंतरही ठोस प्रतिसाद मिळत नाही असे निरीक्षण अनेकदा नोंदवले गेले आहे. काही मुले लग्न जुळावे म्हणून शहरात नोकरी शोधण्याच्या मागे धावू लागली आहेत, तर काही कुटुंबे गावातील संसार सोडून मुलाच्या लग्नासाठी शहरात रहिवासी पत्ता निर्माण करण्याचा विचार करत आहेत.
लग्नसराईच्या तोंडावर उमटलेली ही बदलती हवा शहराच्या चकाकीत संसाराचा खरा पाया विसरला जातोय का? हा प्रश्न आता अधिक गांभीर्यानं विचार करण्यासारखा ठरू लागला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 20/Nov/2025