Pawas : बसस्थानकातील शौचालय दुरुस्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने टाळे

पावस : प्रवासी जनतेच्या मागणीनुसार पावस बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाची टाकी चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे वारंवार भरत असल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने परिवहन खात्याने ती साफ करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने कुलूप ठोकण्यात आले आहे. तरी तातडीने शौचालयाच्या टाकीची दुरुस्ती करून प्रवासी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे

पावस बसस्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नवीन शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांतून करण्यात आली. अखेर पावस ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७ हजार रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले. त्यानंतर पावस बसस्थानक इमारत व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले; परंतु, नव्याने बांधलेल्या शौचालयाच्या टाकीचे काम योग्यत-हेचे नसल्यामुळे व प्रवासी जनता त्याचा वापर करत असल्यामुळे वारंवार शौचालय भरत होते. त्यावेळी परिवहन खात्याच्या माध्यमातून त्याची स्वच्छता केली जात होती. त्याकरिता प्रत्येक संबंधित खात्याला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत होता. हा खर्च त्यांना परवडत नसल्यामुळे त्या शौचालयाच्या भागाला कुलूप लावण्यात आले.

त्यानंतर बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी करण्याकरिता पालकमंत्र्यांनी दौऱ्यात शौचालयाची पाहणी केली असता नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढू असे आश्वासन पावस परिसरातील प्रवासी जनतेला दिले होते.

आता या गोष्टीला सहा महिने उलटले तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शौचालय टाकीची साफसफाई करता येत नसल्यामुळे शौचालयाला कुलूप लावले आहे.या संदर्भात गावडे आंबेरे येथील प्रवासी सुरेश तिवरेकर म्हणाले की, पावस बस स्थानकातील शौचालाची टाकी नियमितपणे साफ करत नसल्यामुळे शौचालयाला कुलूप लावले असल्यामुळे प्रवासी जनतेला त्याचा काही उपयोग होत नाही. फक्त मुतारी चालू आहे व त्याचे सांडपाणी टाकीच्या बाहेर वाहत असल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्हा होणारा त्रास कमी करण्यासाठी तरी या शौचालयाची नियमितपणे साफसफाई करावी, अशी मागणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 21-Nov-2025