रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरलेले प्रभाग क्रमांक १० (Ward No 10) मधील बंड शमवण्यात अखेर यश आले आहे. झाडगाव परिसरातील भाजपचे कट्टर समर्थक आणि अपक्ष उमेदवार विभव पटवर्धन (Vibhav Patwardhan) यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सकाळी थेट पटवर्धनांचे घर गाठून केलेल्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ (Breakfast Diplomacy) मुळे हे शक्य झाले असून, भाजपच्या अधिकृत उमेदवारावरील संकट टळले आहे.
प्रभाग १० मध्ये भाजपची जागा धोक्यात आली होती
प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपने राजू तोडणकर (Raju Todankar) यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि विशेषतः विभव पटवर्धन प्रचंड नाराज होते. हा प्रभाग ‘खुला’ (Open Category) असूनही भाजपने येथे ओबीसी उमेदवार दिल्याने स्थानिक मतदारांवर आणि इच्छुक उमेदवारांवर अन्याय झाला आहे, अशी भावना पटवर्धन यांनी व्यक्त केली होती. “आमच्यावर उमेदवार लादला गेला आहे,” असा आरोप करत त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. विभव पटवर्धन हे झाडगाव परिसरातील एक प्रतिष्ठित नाव आहे. त्यांचे कुटुंब मोठे असून त्यांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजपची हक्काची जागा धोक्यात आली होती.
सामंतांची मध्यस्थी आणि माघार
ही जागा हातची जाऊ नये यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. आज (शुक्रवारी) सकाळीच उदय सामंत विभव पटवर्धन यांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी पटवर्धन यांच्यासोबत नाश्ता करत मनमोकळी चर्चा केली. “तुम्ही पक्षाचे जुने आणि निष्ठावान सहकारी आहात. तुमच्या भावनांची कदर केली जाईल. भविष्यात तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याचा शब्द मी तुम्हाला देतो,” अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली. पालकमंत्र्यांचा हा मोठेपणा आणि त्यांनी दिलेला शब्द मानून विभव पटवर्धन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रभाग १० मधील महायुतीचा मार्ग मोकळा झाला असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.














