चिपळूण : चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाचा नवा उजेड पसरला आहे. ३१० सौर पथदिव्यांच्या स्थापनेद्वारे १२ गावांतील ११४ वाड्यांचे शाश्वत विद्युतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमामुळे हजारो ग्रामीण नागरिकांच्या जीवनात सुरक्षितता, प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा प्रकल्प TUV-SUD,निर्मिती फाउंडेशन आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून, संपूर्ण भारतात “द सोलार मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे डॉ. सचिन यशवंत शिगवण यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा उपक्रम ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होऊन १५ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला. या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील मांडकी खुर्द, पालवण, आगवे, वीर, देवपाट, तोंडली, नायशी, वडेरु आणि पेढांबे ही गावे तसेच संगमेश्वर तालुक्यातील आंबव, नारडुवे आणि शिरंबे ही गावे सहभागी होती. ग्रीन इंडिया इनिशिएटिव्हच्या तांत्रिक टीमने CEO सुयोग गंगावणे, इंजिनीर मोहित वैद्य, इंजिनीर अनुप राजमाने, सिनियर electrician श्री दिलीप घाणेकर & ईतर सहकारी सुरज, आर्यन आणि आयुष यांनी प्रत्येक गावाचे सर्वेक्षण करून आवश्यक आणि योग्य ठिकाणी सौर पथदिव्यांची स्थापना केली. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच श्रमदानाद्वारे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकसहभागातून साकार झाला.
पूर्वी या गावांमध्ये रात्रीच्यावेळी अंधारामुळे असुरक्षित वातावरण निर्माण होत असे. वनक्षेत्राच्या सान्निध्यात असल्याने वाघ, बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे ग्रामस्थांना रात्री हालचाल करणे कठीण जात असे. सौर पथदिव्यांच्या स्थापनेनंतर आता ग्रामस्थ निर्धास्तपणे रात्रीच्या वेळी वावरतात. गावांमध्ये प्रकाशासोबतच सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. हा प्रकल्प केवळ वीजपुरवठ्याचा नव्हे तर सुरक्षितता, आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकासाचा किरण ठरला आहे. ग्रामीण भारतात हरित ऊर्जा आणि सामाजिक परिवर्तनाचे हे उज्ज्वल उदाहरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:57 PM 21-Nov-2025














