खेड : खेड शहरातील बसस्थानक परिसर अक्षरशः खड्डयांच्या गराड्यात सापडला असून प्रवाशांसह वाहनचालकांचे हाल सुरूच आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत सर्वत्र खोलखोल खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. या खड्ड्यांतूनच गाड्यांना मार्गक्रमण करावे लागते, तर पायी चालणाऱ्या नागरिकांना पाय मुरगळण्यापर्यंत गंभीर इजा होण्याच्या घटना समोर येत आहेत.
गणपती उत्सवापूर्वी बसस्थानकातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली. मात्र रात्रीच्या अंधारात निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. यासंबंधीचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
या प्रकरणी अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर, पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्डे अधिक वाढत असल्याने काम करणे अशक्य झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तात्पुरती डागडुजी करून काम थांबविल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पावसानंतर हे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले; परंतु अनेक आठवडे उलटूनही कामाची कोणतीच हालचाल दिसत नाही.
गणपतीपूर्वी करण्यात आलेल्या कामाची दयनीय अवस्था आजही पाहायला मिळते. बसवलेले पेव्हर ब्लॉक उखडून बाहेर आले असून त्याच ठिकाणी पुन्हा मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या निकृष्ट कामावर महामंडळाकडून संबंधित ठेकेदाराला कोणत्या सूचनांची नोंद देण्यात आली याबाबत कोणतीही माहिती बाहेर समोर येत नाही. उलट या संपूर्ण प्रकरणात ‘अधिकारी ठेकेदाराच्या पाठीशी उभे आहेत’ अशीच भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असल्याने खेड बसस्थानकात नेहमीच मोठी गर्दी असते. ग्रामीण भाग, शहराभोवतालातील गावं, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना बसस्थानकाची ही दयनीय अवस्था प्रवाशांच्या सुरक्षिततेशी सरळसरळ खेळ करत असल्याचे स्पष्ट दिसते. दररोज या खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा पाय घसरून जखमी होण्याच्या घटना घडत असून बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवरच मोठे खड्डे असल्याने येणारी सर्व वाहने या खड्ड्यांवरूनच मार्गक्रमण करत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन झोपेत असल्याची परिस्थिती कायम आहे. खेड़ बसस्थानकातील या अत्यंत गंभीर स्थितीवर तात्काळ पावले उचलून दर्जेदार दुरुस्तीचे काम सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवाशांच्या सुरक्षिततेला होणाऱ्या धोका आणि वाढती नाराजी यामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहणार हे मात्र निश्चित.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:03 PM 21-Nov-2025










