“भाजपला गुंडाळल्याचा प्रचार खोटा”; जिल्ह्यात दोन नगराध्यक्षांसह सन्मानजनक जागा मिळाल्याचा दीपक पटवर्धन यांचा दावा!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून (Seat Sharing) भाजपला कमी लेखले जात असल्याचा किंवा ‘भाजपला गुंडाळण्यात आले’ असा प्रचार काही लोकांकडून केला जात आहे. मात्र, हा एक ‘फेक नॅरेटिव्ह’ (Fake Narrative) असून, महायुतीमध्ये भाजपला अत्यंत सन्मानजनक जागा आणि दोन नगराध्यक्ष पदे मिळाली आहेत, असा दावा भाजपचे जिल्हा संयोजक दीपक पटवर्धन (Deepak Patwardhan) यांनी केला आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीच्या जागावाटपाचे गणित आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला.

गुहागर आणि देवरुखमध्ये भाजपचा नगराध्यक्ष!

जागावाटपावर बोलताना पटवर्धन म्हणाले, “महायुतीत जागावाटप हे केवळ मागणीवर नाही, तर ‘निवडून येण्याची क्षमता’ (Winability) यावर ठरले आहे. गुहागरमध्ये अनेक वर्षांनंतर भाजपला राजकीय पटलावर मुख्य खेळाडू म्हणून उतरण्याची संधी मिळाली असून, तेथील नगराध्यक्ष पद भाजपच्या वाट्याला आले आहे. ही पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मनोबल वाढवणारी घटना आहे. यासोबतच देवरुखचे नगराध्यक्ष पद देखील भाजपला मिळाले असून तिथे ९ नगरसेवक आम्ही लढवत आहोत. चिपळूणमध्ये १२ तर रत्नागिरीत ६ हक्काच्या जागांवर भाजप लढत आहे.”

बंडखोरांनी दाखवला समंजसपणा

यावेळी बंडखोरी शमवण्यात आलेल्या यशाबद्दलही त्यांनी माहिती दिली. “प्राजक्ता रुमडे (Prajakta Rumde), विभव पटवर्धन (Vibhav Patwardhan) आणि शिंदे यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची इच्छा असते, पण युतीचा विजय अधिक मोठा व्हावा आणि व्यापक विकासाचा दृष्टिकोन ठेवून या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक अजेंडा बाजूला ठेवला आहे. याबद्दल पालकमंत्री उदय सामंत आणि मी स्वतः त्यांचे आभार मानतो,” असे पटवर्धन म्हणाले.

९० टक्के ‘स्ट्राईक रेट’चे लक्ष्य

भाजपला कमी जागा मिळाल्याच्या आरोपाचे खंडन करताना त्यांनी आकडेवारी मांडली. “एनडीए किंवा महायुतीच्या निवडणुकांमध्ये जागावाटप हे जिंकण्याच्या निकषावर होते. आमचा स्ट्राईक रेट (Strike Rate) हा ९० टक्क्यांच्या आसपास असतो. त्यामुळे जिथे जो पक्ष प्रभावी आहे, तिथे त्याला जागा दिली आहे. रत्नागिरीतही महायुतीचे ९० टक्क्यांहून अधिक उमेदवार विजयी होतील आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील,” असा विश्वास दीपक पटवर्धन यांनी शेवटी व्यक्त केला.