रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी (Ratnagiri Municipal Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीतून माघार घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असतानाच आलेल्या या बातमीमुळे निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
राज ठाकरेंचा ‘तो’ आदेश आणि माघार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानुसार रत्नागिरीतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसेचे अधिकृत चिन्ह नसले तरी, पक्षाने काही अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले होते. मात्र, मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि राजकीय रणनीतीचा भाग म्हणून, राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मनसे पुरस्कृत सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
उद्धव ठाकरे गटाला मिळणार बळ
मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव (Rupesh Jadhav) यांनी याबाबतचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (SS UBT) पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे रत्नागिरी शहरात ‘ठाकरे’ गटाची ताकद वाढली आहे. मनसेचा असलेला तरुण मतदार आणि स्थानिक नेटवर्क आता उबाठा गटाच्या पाठीशी उभे राहणार असल्याने, महायुतीसमोरील (विशेषतः शिंदे गट आणि भाजप) आव्हान अधिक कठीण झाले आहे. दोन चुलत भावांचे पक्ष (राज आणि उद्धव ठाकरे) स्थानिक पातळीवर एकाच विचाराने एकत्र आल्याने मतदारांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे.










