रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षणसंस्था आयोजित मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आज (ता. २२) चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरी येथे रंगणार आहे. या संमेलनानिमित्ताने सकाळी ७ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.
नवनिर्माण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. राजन गवस हे भूषवणार असून, संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषामंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, पद्मश्री मधूमंगेश कर्णिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, श्रीगौरी सावंत, अनंत राऊत, डॉ. प्रदीप मुणगेकर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे हे उपस्थित राहणार आहेत. एकदिवसीय साहित्य संमेलनाची सुरवात उषःकाल काव्यमैफल या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. खल्वायन संस्थेच्या माध्यमातून ही मैफल सकाळी ६ वाजता रंगणार आहे.
त्यानंतर रत्नागिरी शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी जे. के. फाईल ते साहित्यनगरीपर्यंत सकाळी ७.३० वा. होईल. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बदीउज्ञ्जमा खावर सभागृह, माधव कोंडविलकर ग्रंथप्रदर्शन आणि चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरी या व्यासपिठांचे उद्घाटन होईल. संमेलनाचे उद्घाटन भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी ९ वा. होईल. संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनाचा समारोप कोकणचा साज, संगमेश्वरी बाज या सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 22-Nov-2025














