दापोलीत कोल्ह्याचा धुमाकूळ; महिलेसह तिघांवर जीवघेणा हल्ला

दापोली : दापोली शहरातील कोकंबाआळी परिसरात गुरुवारी रात्री कोल्ह्याने धुमाकूळ घालत एका महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दापोलीतील कोकंबाआळी येथे राहणारी एक ३२ वर्षीय महिला रस्त्याने आपल्या घरी जात होती. त्याचवेळी अचानक एका कोल्ह्याने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्या पायाला कडाडून चावा घेतला. जखमी अवस्थेत या महिलेला तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेपाठोपाठ याच परिसरात आणखी दोघांवर कोल्ह्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रवीण गणपत राठोड (वय २६) आणि सुरेश काशीराम गोरिवले (६४) यांचा समावेश आहे. कोल्ह्याने या दोघांच्याही पायाला चावा घेतला. या दोघांना देखील तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते.

शहराच्या वस्तीत येऊन कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला केल्यामुळे कोकंबाआळी व दापोली परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्यावेळी एकटे बाहेर पडणे धोकादायक ठरत असल्याने वनविभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 22-Nov-2025