रत्नागिरी: चार महिला एकत्र आल्या की गप्पांचा फड रंगणारच, हे समीकरण पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. पण, यावेळी निमित्त आणि ठिकाण दोन्हीही वेगळं होतं. रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणांगण तापले असतानाच, एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या महिला उमेदवारांनी आज चक्क राजकीय वैर बाजूला सारत गप्पांचा आनंद लुटला. रत्नागिरीतील पत्रकारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज रत्नागिरीच्या सुसंस्कृत राजकीय परंपरांचे दर्शन घडले. या कार्यक्रमात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, शिवानी माने, संध्या कोसुंबकर, सुश्मिता शिंदे, वहिदा मुर्तुझा सहभागी झाल्या होत्या.
‘थेट प्रश्न, थेट उत्तर’: उमेदवारांचा कस
रत्नागिरीतील पत्रकारांच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या महिला उमेदवारांसाठी ‘नगराध्यक्ष उमेदवार: थेट प्रश्न, थेट उत्तर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश उमेदवारांचे व्हिजन जाणून घेणे हा होता. यावेळी जनतेच्या मनातील आणि शहराच्या विकासाचे प्रश्न उमेदवारांना थेट विचारण्यात आले. सर्वच उमेदवारांनी या प्रश्नांना अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जात आपली भूमिका आणि शहराबद्दलचे स्वप्न (Vision) मांडले. व्यासपीठावर असताना प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षाची आणि आपली बाजू खंबीरपणे मांडताना दिसल्या.
कार्यक्रम संपताच रंगल्या गप्पा
कार्यक्रमात एकमेकींच्या विरोधात बोलणाऱ्या, प्रतिदावे करणाऱ्या या महिला उमेदवार कार्यक्रम संपताच मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या. “राजकारण राजकारणाच्या जागी आणि मैत्री मैत्रीच्या जागी,” याचा प्रत्यय यावेळी आला. कार्यक्रम संपल्यानंतर या सर्व महिला उमेदवार चक्क एका घोळक्यात उभ्या राहून मनमोकळ्या गप्पा मारताना दिसल्या. त्यांच्यातील खेळीमेळीचे वातावरण पाहून उपस्थितांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
शिवानी मानेंचा मोठेपणा आणि शिल्पा सुर्वेंचा आशीर्वाद
या गप्पांच्या ओघात एक अत्यंत मनाला भावणारा प्रसंग घडला. ‘उबाठा’ (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार शिवानी माने यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून शिल्पा सुर्वे यांना ज्येष्ठत्वाचा मान दिला. शिवानी माने यांनी विनम्रपणे शिल्पा सुर्वे यांना नमस्कार केला, आणि सुर्वे यांनीही तो तितक्याच आपुलकीने स्वीकारला. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असूनही, एकमेकींविषयी असलेला हा आदर रत्नागिरीच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा होता.
सुसंस्कृत रत्नागिरीचे दर्शन
रत्नागिरी हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. आजच्या या प्रसंगाने या ओळखीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. आपली ओळख, पक्षाची भूमिका आणि शहराच्या विकासाचा आराखडा मांडल्यानंतर, या महिला उमेदवार अत्यंत निकोप मनाने पुन्हा आपल्या प्रचारासाठी मार्गस्थ झाल्या. निवडणुकीतील चुरस कायम असली तरी, त्यातील कटुता व्यक्तिगत पातळीवर येऊ न देण्याचा हा वस्तुपाठच या महिला उमेदवारांनी घालून दिला आहे.














