खेड : तालुक्यातील चिंचवली चव्हाणवाडी येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
विजया विजय चिचविलकर (३६, व्यवसाय मदतनीस, जि.प. प्राथमिक शाळा चिंचवली) यांनी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वा.च्या सुमारास चिंचवली-चव्हाणवाडीत ही घटना घडली. विजया या बेडरूममध्ये पती, मुले आणि मोठे दिर रंजन यांच्यासोबत बसल्या असताना त्यांचे पती विजय रघुनाथ चिचविलकर (३७) यांनी दारूच्या नशेत चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला.
वाद वाढताच संशयिताने बेडरूममध्ये ठेवलेला बसायचा पाट उचलून विजया यांच्या डोक्यात व कपाळावर मारहाण केली. या हल्ल्यात विजया चिचविलकर यांना दुखापत झाली असून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी सायं. ६.४८ वा. तक्रार नोंदवण्यात आली आहे. खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 26/Nov/2025














