रत्नागिरी: “निवडणुका येतात आणि जातात, पण आम्ही केलेली युती ही सत्तेसाठी नसून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आहे. रत्नागिरीत केवळ रस्ते-गटारे नाही, तर २० हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प आणि ओशन युनिव्हर्सिटीसारखे प्रकल्प आणून आम्ही शहराचा कायापालट केला आहे.” असा घणाघात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केला. रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधील महायुतीचे उमेदवार निमेश नायर, स्मितल पावसकर आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महायुतीचे सर्व पदाधिकारी, भाजपचे दीपक पटवर्धन, अशोक मयेकर आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खाजगी कॉलेज काढून दुकानदारी केली नाही!
विरोधकांचा समाचार घेताना आणि आपल्या कामाची पद्धत स्पष्ट करताना सामंत म्हणाले, “मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो. मला वाटले असते तर मी स्वतःची खाजगी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजे काढून ‘शिक्षण सम्राट’ झालो असतो. पण मी तसे केले नाही. त्याऐवजी रत्नागिरीत शासकीय मेडिकल कॉलेज, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, आणि संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र आणले. कारण मला गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांचे शिक्षण मोफत किंवा कमी खर्चात करायचे होते, त्यांची लूट करायची नव्हती.”
रत्नागिरीच्या विकासाची ‘ब्लूप्रिंट’:
पालकमंत्र्यांनी भाषणात शहराच्या विकासाचा लेखाजोखा मांडला:
- रोजगार आणि उद्योग: चंपक मैदानात २० हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प येत असून, यामुळे रत्नागिरीतील मुलांना परदेशात न जाता इथेच १ ते ५ लाखांचे पॅकेज मिळेल.
- रत्नागिरीचे टॅलेंट: १५० कोटींची इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत कोणत्याही बाहेरच्या ठेकेदाराने नाही, तर रत्नागिरीतील ९ तरुणांनी स्थापन केलेल्या ‘निर्माण ग्रुप’ने विक्रमी वेळेत पूर्ण केली.
- पर्यटन: थिबा पॅलेसवरील देशातील पहिला ‘थ्रीडी मल्टिमीडिया शो’, मालगुंडचे प्राणीसंग्रहालय आणि स्थानिक वीरेंद्र वन यांनी साकारलेली भव्य शिवसृष्टी यामुळे पर्यटन वाढले असून हॉटेल व्यावसायिकांना त्याचा थेट फायदा होत आहे.
- भविष्यातील प्रकल्प: ५ एकर जागेवर घनकचरा प्रकल्प, नवीन विमानतळ आणि ६ महिन्यात सुरू होणारे देशातील पहिले सागरी विद्यापीठ (Ocean University).
स्मितल पावसकर आणि निमेश नायर यांचे कौतुक
प्रभाग २ मधील राजकारणावर बोलताना सामंत यांनी ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर यांच्या निष्ठेचा विशेष उल्लेख केला. “नगराध्यक्षपदासाठी स्मितलताई प्रबळ दावेदार होत्या, पण पक्षाने शिल्पाताईंचे नाव निश्चित करताच स्वतः स्मितलताईंनी त्यांचा हात धरून अर्ज भरण्यासाठी नेले. हाच महायुतीचा आणि आमचा संस्कार आहे,” असे सामंत यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच, निमेश नायर यांनी मागील ५ वर्षांत केलेल्या कामाचे कौतुक करत, “भविष्यात पुन्हा पाणी सभापती निमेशलाच करावे लागेल,” अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
शिल्पाताई सुर्वे: एक सुसंस्कृत नेतृत्व
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे या शिक्षिका असून त्या शहराला पारदर्शक कारभार देतील, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. “शिल्पाताईंच्या हातात छडी असली तरी त्या प्रेमाने शहर चालवतील,” असे म्हणत त्यांनी विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल इतक्या मोठ्या फरकाने महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले.
“विरोधक दररोज पत्रकार परिषदा घेत आहेत, पण त्याने आमची १,००० मते वाढतच आहेत. ३ तारखेला रत्नागिरीकर विकासाच्या बाजूने कौल देतील आणि शहरात १५ हजारांचे मताधिक्य असेल.” – ना. उदय सामंत (पालकमंत्री, रत्नागिरी)
रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुसंस्कृत नेतृत्वासाठी धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन ना. उदय सामंत यांनी शेवटी केले.














