Kumbharli Ghat | कुंभार्ली घाटातील वळणावर रस्त्याची दुरवस्था

खेड : कुंभार्ली घाटातील अवघड वळणावरच मोठमोठे खड्डे पडल्याने मालवाहू ट्रक या खड्यात बंद पडून वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळी चिपळूणहून कराडकडे जाणारा मालवाहू ट्रक घाटातील अवघड वळणावर खड्यात बंद पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. हा घाट कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक प्रमुख दुवा आहे; परंतु येथील तीन वळणांमुळे तो धोकादायक मानला जातो.

कुंभार्ली घाट तीव्र वळणांमुळे वाहनचालकांसाठी आव्हानात्मक ठरतो. साधारण १५ किमी लांबीच्या या घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत. या घाटातून अवजड वाहने हाकताना चालकांची कुचंबणा होते. घाटातील अवघड वळणावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचा वेग मंदावत असून, अचानक वाहने बंद पडत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

या घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. अवघड वळणावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे मालवाहू ट्रक, खासगी आराम बस या अवघड वळणावरील खड्ड्यांमध्ये बंद पडण्याच्या घटना सर्रास घडत आहेत.

संरक्षक भिंतीची दुरवस्था
संरक्षक भिंतीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंती आणि रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहेत. अतिवृष्टीमुळे काही भागांत रस्ता खचला आहे. या घाटात वारंवार दरडी कोसळतात, ज्यामुळे रस्ता बंद होऊ शकतो.

धोकादायक ठिकाणे…

सोनपात्र वळण : हे घाटातील सर्वात धोकादायक ठिकाण मानले जाते. येथे रस्ता अरुंद असून, दरी खोल आहे. पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका जास्त असतो.

पोलिस चौकीजवळील वळण : घाटातील पोलिस चेकपोस्टच्या पुढे तिसरे वळण अत्यंत तीक्षण आहे. अलीकडेच झालेल्या काही अपघातांमध्ये वाहने येथूनच दरीत कोसळल्याच्या नोंदी आहेत.

घाटात अनेक ठिकाणी : “यु-टर्न” आहेत जिथे समोरून येणारे वाहन (विशेषतः मोठे ट्रक किंवा बस) दिसत नाही. अशा वळणांवर “ब्लाइंड स्पॉट” तयार होतात, ज्यामुळे ओव्हरटेक करणे जीवघेणे ठरू शकते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 29/Nov/2025