रत्नागिरी नगर परिषद निवडणूक : प्रभाग १० मधील मतदान लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार रणसंग्राम!

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीत एक मोठी घडामोड समोर आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे आणि अपिलाचा निकाल उशिराने लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने रत्नागिरी नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक १० (Ward No. 10) ची निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे या प्रभागातील मतदारांना आता मतदानासाठी २० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

नेमके प्रकरण काय?

रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात दोन्ही उमेदवारांनी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.

या अपिलावर सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयाने २४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांचे अपील फेटाळून लावले. मात्र, ४ नोव्हेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर आलेल्या निकालांमुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे शक्य नव्हते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी प्रभाग १० ची निवडणूक स्थगित करून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

इतर प्रभागांत निवडणूक वेळेवरच

महत्त्वाचे म्हणजे, हा बदल केवळ प्रभाग क्रमांक १० पुरता मर्यादित आहे. प्रभाग १० वगळता रत्नागिरी नगर परिषदेच्या अन्य सर्व प्रभागांची निवडणूक ही यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसारच (२ डिसेंबर) पार पडणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

प्रभाग १० साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार प्रभाग १० मधील निवडणुकीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील:

  • उमेदवारी अर्ज मागे घेणे: १० डिसेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: ११ डिसेंबर
  • मतदान: २० डिसेंबर (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
  • मतमोजणी: २१ डिसेंबर (सकाळी १० वाजता)
  • आचारसंहिता: ४ डिसेंबरपासून फक्त या प्रभागापुरती आचारसंहिता लागू होईल.

या बदलामुळे प्रभाग १० मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळणार आहे.