रत्नागिरी : शहरात आणि जिल्ह्यात दुचाकीला, विशेषतः बुलेटला ‘मॉडिफाईड सायलेन्सर’ (Modified Silencer) लावून कर्णकर्कश आवाजात धुमाकूळ घालणाऱ्या वाहनचालकांचे धाबे आता दणाणले आहेत. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) नितीन बगाटे यांनी आता ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला असून, शहरात वाहन तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शाळा-कॉलेज परिसरातील त्रासाला बसणार चाप
गेल्या काही दिवसांपासून शहरात, विशेष करून शाळा आणि कॉलेज परिसरात तरुणांकडून मॉडिफाईड सायलन्सर लावून वेगाने दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढले होते. या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात नागरिकांमधून पोलिसांकडे सातत्याने कारवाईची मागणी होत होती. जनतेच्या या मागणीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आता ‘ॲक्शन मोड’मध्ये येत तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
काय आहे ‘बगाटे पॅटर्न’? (संभाजीनगरचा तो किस्सा)
नितीन बगाटे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते यापूर्वी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे कार्यरत असताना त्यांनी बुलेट राजांवर अशीच मोठी कारवाई केली होती. त्यावेळी त्यांनी जप्त केलेल्या तब्बल ३०० सायलेन्सर्सचा वापर करून एक आगळेवेगळे ‘रॉकेट’ तयार केले होते. विशेष म्हणजे संभाजीनगरच्या मुख्य क्रांती चौकात हे सायलेन्सरचे रॉकेट सुशोभिकरणाचा भाग म्हणून बसवण्यात आले होते. “नियम तोडणाऱ्यांनो, तुमच्या सायलेन्सरचे काही खरे नाही,” असा सूचक संदेशच त्यांनी त्या कारवाईतून दिला होता. आता तोच ‘बगाटे पॅटर्न’ रत्नागिरीत राबवला जाणार असल्याने फॅन्सी सायलेन्सर लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत:
एका दुचाकी वाहनावर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सदर वाहनाचा कर्णकर्कश आवाज करणारा सायलन्सर जप्त करण्यात आला.
वाहन चालकाने सायलेन्सरमध्ये बदल (Modified) केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे आता शहरातील ध्वनी प्रदूषण कमी होईल आणि रस्ते अधिक सुरक्षित होतील, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.














