रत्नागिरी, चिपळूणसह ७ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी यंत्रणा सज्ज; ६४ हजार मतदारांच्या हाती शहराची चावी
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा आज (दि. १ डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेला नेत्यांचा राबता, सभा आणि पदयात्रांचा धुरळा आज रात्री १० वाजता खाली बसणार आहे. आज रात्री १० वाजता प्रचाराची अधिकृत सांगता होणार असून, त्यानंतर ‘थेट प्रचाराला’ बंदी असणार आहे. त्यामुळे आता शेवटच्या काही तासांत मतदारांना साद घालण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली आहे.
‘रात्रीस खेळ चाले’वर प्रशासनाची करडी नजर
जाहीर प्रचार थांबल्यानंतर छुपा प्रचार आणि मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रचाराची वेळ संपल्यानंतर सुरू होणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकारावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि निवडणूक प्रशासनासमोर आहे. यासाठी पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार मतदान
जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि खेड या चार नगर परिषदांसह गुहागर, देवरुख आणि लांजा या तीन नगरपंचायतींसाठी उद्या, म्हणजेच २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला असून, मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी शहरात चोख बंदोबस्त रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके पूर्ण झाली आहेत.
एकूण प्रभाग: १६
एकूण मतदान केंद्रे: ६९
एकूण मतदार: ६४,७४६
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी ३९० महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १५८ पोलीस कर्मचारी आणि २४ होमगार्ड्सचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 01/Dec/2025














