आपण भांडत राहिलो तर देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल’; शिल्पाताई पटवर्धनांचा इशारा; गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘अतुल्य भारत’ प्रश्नमंजुषा संपन्न

रत्नागिरी (शैक्षणिक प्रतिनिधी): “भारतावर ब्रिटिशांनी ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा वापर करून दीडशे वर्षे राज्य केले. आजही अनेक परकीय शक्ती भारताकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत. अशा परिस्थितीत जर आपण आपसातच भांडत राहिलो, तर पुन्हा आक्रमण होऊ शकते, हे इतिहासातून शिकले पाहिजे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून एकजुटीने प्रतिकार करणे आणि आपण एक आहोत हे दाखवून देणे, हेच आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी केले.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळा’तर्फे आयोजित ‘अतुल्य भारत प्रश्नमंजुषा’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

संस्कृतीचा अभिमान बाळगा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिल्पाताई पुढे म्हणाल्या की, आपल्या राष्ट्राचा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करा आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगा. यावेळी व्यासपीठावर कार्यवाह सतीश शेवडे, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, कला विभागप्रमुख वैभव कानिटकर, विज्ञान विभागप्रमुख दिलीपकुमार शिंगाडे, इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे आणि समन्वयक प्रा. निनाद तेंडुलकर उपस्थित होते.

एकाच विषयावर स्पर्धा हवी: सतीश शेवडे कार्यवाह सतीश शेवडे यांनी आपल्या मनोगतात पुढील स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले, “पुढच्या वेळी रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज अशा एकाच विषयावर प्रश्नमंजुषा आयोजित करावी. यामुळे विद्यार्थ्यांचा त्या विषयाचा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास होईल. एकसंध भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बालदोस्तांसह नागरिकांनी योगदान देणे गरजेचे आहे.”

इतिहासाची आवड निर्माण व्हावी: डॉ. घाटे इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना अतुलनीय भारताचे वैभव समजावे, इतिहासाची आवड निर्माण व्हावी आणि ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, या हेतूनेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.”

यशस्वी विद्यार्थी आणि निकाल या स्पर्धेत शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे:

प्रथम क्रमांक: रा. भा. शिर्के प्रशाला (विद्यार्थी: अत्रेय देवस्थळी, श्रेया वाडकर, चैतन्य मुळ्ये | मार्गदर्शक: राजेश आयरे)

द्वितीय क्रमांक (विभागून):

नवनिर्माण हायस्कूल (विद्यार्थी: प्रसेनजित कांबळे, जयराज चौरी, भार्गवी पवार | मार्गदर्शक: सौ. अलमास लांबे)

जी.जी.पी.एस. (GGPS) (विद्यार्थी: आभा भाटवडेकर, आयुष ठाकूर, राधा खानोलकर | मार्गदर्शक: सोनिया कांबळे)

तृतीय क्रमांक: फाटक हायस्कूल (विद्यार्थी: रुद्र घडशी, तपस्या बोरकर, सिद्धी मोडक | मार्गदर्शक: सौ. श्रेया रानभरे)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी जोशी हिने केले, तर प्रा. निनाद तेंडुलकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे शिक्षक दत्तात्रय माळवदे, दिलीप जाधव, अन्वी कोळंबेकर, अपर्णा तगारे, आदेश मुकणे, योगेश जाधव, मधुरा चव्हाण, संयुक्ता शेट्ये आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 01/Dec/2025