रत्नागिरीतील मच्छीमारांवर अस्मानी संकट! धोक्याचा इशारा संपला, पण जाळ्यात मासा गावेना; रिकाम्या हाताने नौका परतल्या बंदरात

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): हवामान विभागाने वर्तवलेला पाच दिवसांचा धोक्याचा इशारा संपल्यानंतर मोठ्या आशेने समुद्रात गेलेल्या रत्नागिरीतील मच्छीमारांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. समुद्रात अजूनही सोसाट्याचा वारा आणि उंच लाटा उसळत असल्याने, तसेच जाळ्यात अपेक्षित मासळीच सापडत नसल्याने अनेक नौका मासेमारी अर्धवट सोडून बंदरात परतत आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या कोकणातील मच्छीमारांचे आर्थिक गणित यामुळे पूर्णपणे कोलमडले आहे.

इशारा संपला, पण संकट कायम

हवामान विभागाने २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत समुद्रात न जाण्याचा धोक्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागानेही मच्छीमारांना सजग केले होते. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून हजारो नौका किनाऱ्यावरच नांगरून होत्या. रविवारी (दि. ३०) इशाऱ्याची मुदत संपल्यानंतर मच्छीमारांनी पुन्हा समुद्राची वाट धरली. मात्र, रविवारी सकाळी गेलेल्या नौका समुद्रातील प्रतिकूल वातावरणामुळे सायंकाळीच बंदरात परतल्या.

खर्च ५० हजार अन् उत्पन्न नाममात्र!

या परिस्थितीबाबत मच्छीमार सचिन खेत्री यांनी आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, “डिझेल, बर्फ आणि रेशन असा एका फेरीचा खर्च दिवसाला ५० ते ६० हजार रुपयांच्या घरात जातो. मात्र, सध्या समुद्रात मासळीच मिळत नाही. एवढा खर्च करून जाळ्यात केवळ चार-पाच टप मासळी मिळत असेल, तर डिझेलचा खर्चही निघत नाही.” वाऱ्यासोबत समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे नौका स्थिर ठेवणे कठीण होत असल्याने मासेमारी अर्धवट सोडावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

गितवाह’ वादळाचा फटका?

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजारांहून अधिक मच्छीमार नौका आहेत. स्थानिक मच्छीमारांच्या अंदाजानुसार, श्रीलंकेत निर्माण झालेले ‘गितवाह’ (Gitwah) चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकत आहे. त्याचाच परिणाम म्हणून अरबी समुद्रात उंच लाटा उसळत असून जोरदार वारे वाहत आहेत. अशा वातावरणामुळे मासळी खोल समुद्रात किंवा सुरक्षित जागी जात असल्याने जाळ्यात मासे सापडत नसावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर

गेल्या साडेतीन महिन्यांत हवामान विभागाकडून अनेकदा धोक्याचे इशारे देण्यात आले आहेत. त्यामुळे मासेमारीचा बहुतांश काळ हा नौका बंदरात उभे करण्यातच गेला आहे. आता पुन्हा २५ ते २९ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या बंदीमुळे आणि त्यानंतरच्या मासळी दुष्काळामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 01/Dec/2025