खेडमध्ये ‘शौर्या’ची उपेक्षा! ७ वर्षांपासून लढाऊ विमान स्मारकाचे काम अर्धवट; नगर परिषदेच्या कारभारावर माजी सैनिक संतापले

खेड (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषद हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या शिवतर गावाने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात देशासाठी आपले रक्त सांडले, त्या गावाच्या शौर्याचे प्रतीक म्हणून आणलेले ‘मिग’ लढाऊ विमान गेल्या सात वर्षांपासून नगर परिषदेच्या अनास्थेमुळे धूळ खात पडले आहे. ३८ लाख रुपये खर्च करूनही हे स्मारक अपूर्णच असल्याने स्थानिक नागरिक आणि माजी सैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिवतरची शौर्यगाथा आणि स्मारकाचे स्वप्न

खेड तालुक्यातील शिवतर गावाला मोठी सैनिकी परंपरा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात या एकाच गावातून तब्बल २३४ जवानांनी सहभाग नोंदवला होता, तर अनेकांनी बलिदान दिले होते. या वीरांच्या शौर्याची आठवण जपण्यासाठी २०१ बीज रोवले गेले. माजी सैनिकांच्या मागणीनुसार आणि तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने खेड नगर परिषदेला एक खरेखुरे ‘मिग’ लढाऊ विमान भेट दिले होते.

सात वर्षे उलटली, तरी काम अर्धवटच!

२०१८ मध्ये हे विमान खेडमध्ये आले. नगर परिषदेने स्मारकासाठी ३८ लाख रुपये मंजूर करून प्रबोधनकार ठाकरे उद्यानात एक चौथरा उभारला आणि त्यावर हे विमान बसवले. मात्र, त्यानंतर प्रशासनाला याचा विसर पडला की काय, अशी स्थिती आहे.

अपूर्ण कामे: विमानासाठी संरक्षणात्मक शेड, माहिती फलक, विद्युत रोषणाई (Lighting), परिसर सौंदर्यीकरण आणि सुरक्षा रक्षक यांपैकी एकही गोष्ट आजतागायत पूर्ण झालेली नाही.

८० टक्के काम बाकी: गेल्या सात वर्षांपासून जवळपास ८० टक्के काम ‘जैसे थे’ स्थितीत अडकून पडले आहे.

पर्यटकांचा होतोय भ्रमनिरास

सध्या हे विमान प्रबोधनकार ठाकरे उद्यानातील एका कोपऱ्यात उघड्यावर पडलेले आहे. त्याची निगा राखली जात नसल्याने आणि माहिती फलक नसल्याने उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना आणि लहान मुलांना हे खरे युद्धविमान आहे की उद्यानातील खेळण्याचा एखादा भाग, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्षात हे संरक्षण विभागाकडून मिळालेले आणि युद्धात वापरलेले खरेखुरे मिग विमान आहे, याची पुसटशी कल्पनाही पर्यटकांना येत नाही.

हा तर हुतात्म्यांचा अपमान!

ब्रिटिशकालीन विजयस्तंभाची साक्ष देणाऱ्या शिवतर गावासाठी हे स्मारक अभिमानाचा विषय होते. मात्र, त्याची ही दुरवस्था पाहून ग्रामस्थ आणि माजी सैनिक व्यथित झाले आहेत. “शहीदांच्या स्मृतीशी आणि शौर्याशी नगर परिषदेने केलेला हा निष्काळजीपणा म्हणजे सैनिकांचा अवमान आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सैनिकांनी दिली आहे.

प्रशासनाला सवाल निधी मंजूर असतानाही काम का रेंगाळले? या दिरंगाईला जबाबदार कोण? आणि सध्याच्या निवडणुकीच्या काळात तरी हा मुद्दा का उचलला गेला नाही? असे तिखट सवाल आता खेडचे नागरिक विचारत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 01/Dec/2025