दापोली : कृषी समृद्धी योजनेअंतर्गत दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी तर दिला; मात्र प्रत्यक्ष लाभ मिळविताना शेतकऱ्यांना बँकांच्या दारात हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. ‘आज या, उद्या या’, अशी बँकांची परवड सुरू असून, कर्ज प्रस्ताव मंजुरीला होत असलेल्या विलंबामुळे आगामी हंगामातील शेतीकामांवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील एकूण ४८ सजे अंतर्गत ४०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत सुमारे ९ कोटींच्या निधीची तरतूद आहे. कृषी अवजारे खरेदीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदानाचा लाभ मिळणार आहे. स्वावलंबी शेती हा शासनाचा प्रमुख हेतू असतानाही बँकांच्या कारभारामुळे तो मार्गी लागताना अडथळे निर्माण होत आहेत.
मात्र बँकांकडून सीबील स्कोअर, अतिरिक्त कागदपत्रे, हमीदार, अशा कारणांवरून कर्ज प्रक्रियेला विलंब लावला जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे. वेळेत कर्ज न मिळाल्यास यांत्रिकीकरणाच्या नियोजित कामांना उशीर होणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा परिणाम होणार आहे.
कृषी विभागाच्या वेगवान निवड प्रक्रियेचे प्रयत्न बँकांच्या विलंबामुळे अर्थहीन ठरत असल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने संबंधित बँकांना स्पष्ट निर्देश देऊन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज व अनुदानाचा लाभ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
‘शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्यात अडचण भासत असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. योग्य ते मार्गदर्शन व मदत केली जाईल.’ हेमंत ठोंबरे,तालुका कृषी अधिकारी, दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 01/Dec/2025














