रत्नागिरीच्या कायापालटासाठी ‘शिल्पाताई’ हेच उत्तर! उदय सामंत यांचे हात बळकट करा; साहील पठाण यांचे आवाहन

रत्नागिरी (राजकीय प्रतिनिधी): “रत्नागिरी हे केवळ शहर नसून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आणि कायापालट करण्याचा वसा राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना स्थानिक पातळीवर साथ देण्यासाठी आणि शहराच्या विकासाची गती वाढवण्यासाठी या निवडणुकीत महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. शिल्पाताई सुर्वे यांनाच भरघोस मतांनी विजयी करा,” असे जोरदार आवाहन शिवसेना (शिंदे गट) शहर अल्पसंख्याक प्रमुख साहील पठाण यांनी केले आहे.

मुस्लिम समाजाला साद

साहील पठाण यांनी शहरातील मुस्लिम बांधवांना विशेष आवाहन केले आहे. ते म्हणाले, “मला माझ्या मुस्लिम समाजाच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की, आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. विशेषतः मुस्लिम बहुल वस्ती असलेल्या मिरकरवाडा, राजीवडा, कोकण नगर आणि बाजारपेठ या भागांमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आज मार्गी लागत आहेत. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी कोणत्याही भेदभावाविना मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे.”

सामंत बंधूंचे हात बळकट करा

शहराच्या विकासाचा हा वेग असाच कायम ठेवायचा असेल, तर नगरपालिकेत सत्ता आणि नगराध्यक्ष आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे. त्यामुळे या सार्वत्रिक रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत विकासाच्या बाजूने कौल द्या. शिल्पाताई सुर्वे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून पालकमंत्री उदय सामंत आणि किरणभैया सामंत यांचे हात अधिक बळकट करा, असे आवाहन साहील पठाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.