रत्नागिरी: आपल्या चविष्ट वडापावने खवय्यांची भूक भागवणारे आणि रत्नागिरीच्या बाजारपेठेतील एक ओळख बनलेले प्रसिद्ध वडापाव विक्रेते श्रीकांत तोस्कर (उर्फ दादा) यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ४२ वर्षांपासून ते अविरतपणे रत्नागिरीकरांना सेवा देत होते. त्यांच्या जाण्याने रत्नागिरीच्या खवय्यांमध्ये आणि व्यापारी वर्गात शोककळा पसरली आहे. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज (बुधवारी) दुपारी १२.३० वाजता त्यांच्या राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
चहाच्या किटलीपासून सुरू झालेला प्रवास
श्रीकांत तोस्कर यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि कष्टमय होता. सुमारे ४२ वर्षांपूर्वी त्यांनी रत्नागिरीच्या बाजारपेठेत फिरून चहा विकण्यास सुरुवात केली होती. कष्टाची तयारी आणि सचोटीने व्यवसाय करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले. चहा विक्रीतून पुढे त्यांनी वडापावची गाडी सुरू केली आणि बघता बघता ते संपूर्ण रत्नागिरीत फेमस झाले.
फक्त मिरची आणि आल्याचा ‘तो’ खास स्वाद
राम आळी येथील जनता बँकेच्या मागे असलेली दादांची गाडी म्हणजे खवय्यांचे आवडते ठिकाण होते. ‘दादाचा वडा’ या नावाने त्यांची गाडी प्रचंड प्रसिद्ध होती. त्यांच्या वडापावची चव काही न्यारीच होती. केवळ मिरची आणि आलं (Ginger) यांचा वापर करून ते अत्यंत चविष्ट वडापाव बनवत असत. मसाल्याचा अतिरेक न करता सात्विक पण झणझणीत चव हेच त्यांच्या यशाचे गमक होते. दर्जाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, त्यामुळे दिवसभर त्यांच्या गाडीवर खवय्यांची गर्दी असे.
‘दादांचा कट्टा’ आणि मोठा परिवार
गाडीवरील यशानंतर त्यांनी राम आळी येथेच ‘दादांचा कट्टा’ नावाचे हॉटेल सुरू केले होते. तिथेही त्यांनी ग्राहकांचे प्रेम मिळवले. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे दादा सर्वांचे लाडके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ आणि जावई असा मोठा परिवार आहे. एका कष्टाळू आणि प्रामाणिक व्यावसायिकाच्या जाण्याने रत्नागिरी बाजारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे.














