रत्नागिरी येथे ग्रंथपालन वर्ग प्रवेश प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघामार्फत महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी हा मोठा संधीचा योग आहे. प्रवेश प्रक्रिया १ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत राबवली जाणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. प्रत्यक्ष ग्रंथालयीन सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांना प्रवेशात प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक अंत्तरा रहाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ असा ठरवण्यात आला असून शनिवार व रविवार हे वर्गाचे दिवस असतील. ग्रंथालयीन सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करण्याची मोठी संधी तर गृहिणींनाही या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार असल्याचे संघाकडून सांगण्यात आले. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र हे ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने प्रदान केले जाणार आहे. प्रमाणपत्रधारकांना सार्वजनिक ग्रंथालये, महाविद्यालये, माध्यमिक शाळा अशा विविध शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांमध्ये सेवा मिळण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा असे अवाहन स्व. आ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय, रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 03/Dec/2025