रत्नागिरी : गणपतीपुळे येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेशभक्तांनी श्रीं च्या दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. रविवारी (ता. ७) शासकीय सुटी असल्यामुळे दिवसभरात सुमारे ३५ हजार भक्तांनी दर्शन घेतल्याची नोंद गणपतीपुळे मंदिरात झाली आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
दिवाळीपासून पर्यटन हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. परंतु नगरपालिका निवडणुकांमुळे शासकीय कर्मचारी, मध्यमवर्गही लोकं काही प्रमाणात त्यामध्येच व्यग्र झालेले होते. तसेच शाळा, महाविद्यालये सुरुच असल्याने फिरणाऱ्यांचा टक्का कमी झाला होता. परंतु शनिवार, रविवार जोडून सुट्टया आल्या की पर्यटकांची पावले आपसूकच कोकणाकडे वळत होती.
रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे यासह बेळगाव, मराठवाडा येथील पर्यटक शनिवारपासूनच गणपतीपुळेमध्ये दाखल झालेले होते. त्यामुळे लॉजिंगसह न्याहारीनिवास व्यवसायीकांसाठी सलग दोन दिवस चांगले होते. आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये संकष्टी असेल तर गणपतीपुळेत येणाऱ्यांचे टक्का कमी असतो.
श्रीचे दर्शन आणि किनाऱ्यावर फिरणे अशा दोन्ही गोष्टींचा आनंद घेत येत असल्याने पर्यटक असा योग साधत असतात. त्याप्रमाणे कमी रविवारी सकाळी पहाटेला पूजा झाल्यानंतर मंदिरात दर्शनाला सुरवात झाली होती.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे पालखी प्रदक्षिणा सुरू झाली. यावेळी मंदिराचे सरपंच, भाविक उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर पर्यटक किनाऱ्यावर फिरण्यासाठी दाखल होत होते. त्यामुळे फेरीवाले, जलक्रीडा चालक यांचा फायदा झाला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ते किनाऱ्यावर पोलीसांसह देवस्थान आणि ग्रामपंचायतीचे जीवरक्षक नेमण्यात आले आहेत.
संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळे येथे पर्यटकांचा राबता चांगल्यापैकी होता. दर्शन घेण्यासाठी आलेले पर्यटक निवास करत होते. त्यामुळे व्यावसायिकांना लाभ झालेला आहे- कल्पेश सुर्वे, गणपतीपुळे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 08/Dec/2025












