रत्नागिरी : तालुक्यातील निवळी-जयगड मार्गावरील खंडाळा बाजारपेठेत रविवारी सकाळी यामिनी हार्डवेअरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याने मोठी वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत गोडाऊनमधील हार्डवेअरचे लाखो रुपयांचे सामान आणि एक चारचाकी इको कार पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत हार्डवेअरचे सामान आणि वाहनाचे मिळून अंदाजे १४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जयगड पोलिसांनी दिली आहे.
यामिनी हार्डवेअरचे मालक मोहनलाल चौधरी यांचे खंडाळा बाजारपेठेत दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस त्यांनी हार्डवेअरच्या वस्तू साठवण्यासाठी गोडाऊन उभारले होते. तेथे दुकानासाठी लागणारे सामान आणि त्यांची चारचाकी इको गाडी पार्क करून ठेवली जात होती.
रविवारी सकाळी अचानक मोहनलाल चौधरी यांना त्यांच्या गोडाऊनमधून धूर व आगीच्या ज्वाला दिसल्या. त्यांनी तातडीने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी धाव घेतली. तसेच आगीची माहिती मिळताच जेएसडब्ल्यू (JSW) आणि आंग्रे पोर्टच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग काही प्रमाणात शांत झाली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या भीषण आगीमुळे मोहनलाल चौधरी यांच्या गोडाऊनमधील हार्डवेअरचा संपूर्ण साठा आणि त्यांची चारचाकी इको कार पूर्णतः जळून खाक झाली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत यामिनी हार्डवेअरचे मालक मोहनलाल चौधरी यांनी जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 08/Dec/2025












