Ratnagiri : पौर्णिमेच्या चांदण्यामुळे पर्ससीन मासेमारी आठवडाभर राहिली बंद

रत्नागिरी : पौर्णिमेच्या चांदण्यामुळे आठवडाभर बंद असलेली पर्ससीन नेट मासेमारी रविवारपासून हळूहळू सुरू होवू लागली आहे. पौर्णिमेच्या चांदण्यात समुद्रातील मासळी स्थलांतरीत होते. त्यामुळे मासळी जाळ्यात मिळत नाही. परिणामी, मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार नौकांचा खर्च मालकांच्या अंगावर पडण्याची भीती असते. यावर उपाय म्हणून पौर्णिमेच्या मागच्या पुढच्या सात दिवसांमध्ये पर्ससीन नेट मच्छीमार आपल्या नौका समुद्रात मासेमारीसाठी पाठवत नाहीत.

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला मोठे उधाण असते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या चांदण्यामुळे मासळीसुद्धा मिळत नसल्याचा गेले अनेक वर्षातील अनुभव आहे. या अनुभवामुळे गेल्या गुरूवारी झालेल्या पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर पर्ससीन नेट नौका समुद्रातच उभ्या होत्या. रविवारपासून या नौकानी समुद्रात मासेमारी करण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी समाधानकारक बांगडा मिळाल्याचे मच्छीमार नेते जावेद होडेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यात सुमारे ३ हजार ३८७मच्छीमार नौका असून, यामध्ये सुमारे ३९० पर्ससीन नेट नौका आहेत. प्रत्येक नौकेला प्रतिदिन ५० ते ६० हजार रुपये इतका खर्च असतो. यामध्ये नौकेचे इंधन, खलाशी, पागी, तांडेल यांच्या जेवणाचे जिन्नस, बर्फ आदी खर्चाचा समावेश होतो. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली असली, तरी यातील अनेक दिवस लांबलेला पाऊस, समुद्रातील वादळी वाऱ्यांचा इशारा अशा कारणांमुळे मासेमारीसाठी नौका समुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. त्यात आता पौर्णिमेच्या चांदण्यामुळे आठवडाभर मासेमारी बंद होती. त्यामुळे या नौका बंदरातच उभ्या होत्या. पौर्णिमेच्या चांदण्याचा परिणाम कमी झाल्याने आता पर्ससीन नेट नौका हळूहळू समुद्रात मासेमारीसाठी जाऊ लागल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 08/Dec/2025